Viral Video : पंजाबच्या (Punjab News) लुधियानामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लुधियाना येथील प्रसिद्ध प्रकाश ढाब्यावर (Prakash Dhaba) ही सगळी विचित्र घटना घडली. हॉटेलमध्ये मटण खाण्यासाठी आलेल्या एका कुटुंबाला ताटामध्ये मेलेला उंदीर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि आता मालकाला यामध्ये ग्राहकानेच काहीतरी केले आहे असे वाटत आहे. दुसरीकडे ग्राहकाने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून ढाब्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पंजाबमधील लुधियानामध्ये एका ग्राहकाने प्रकाश ढाबाच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. ढाब्यावर दिलेल्या मटणात मेलेला उंदीर आढळून आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. प्रेम नगर येथील रहिवासी असलेल्या विवेक कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे. रविवारी रात्री आपण विश्वकर्मा चौकाजवळील प्रकाश ढाब्यावर कुटुंबासोबत जेवायला गेला होता, असे एफआयआरमध्ये विवेक कुमारने म्हटले आहे.
ढाब्यावर पोहोचल्यावर आम्ही मटण आणि चिकनची ऑर्डर दिली होती. पण जेव्हा जेवण आणलं आणि आम्हाला वाढलं गेलं तेव्हा काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. मटणाची प्लेट तपासली असता त्यात मेलेला उंदीर आढळून आला, असे तक्रारदाराने सांगितले. विवेक कुमारने त्यानंतर या सर्व प्रकाराबाबत ढाबा मालकाला जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र ढाबा मालकाने उलट आपल्यालाच धमकवल्याचा आरोप विवेक कुमारने केला आहे.
विवेक कुमारने या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ शूट केला पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. बाकीचे मटण खाल्ल्यानंतर मला आणि माझ्या कुटुंबातील लोकांच्या पोटात दुखू लागले असेही विवेक कुमारने सांगितले. पोलिसांनी ढाबा मालकाविरुद्ध भादवि कलम 273 (हानीकारक अन्न किंवा पेय विक्री) आणि 269 (जीवासाठी धोकादायक रोगाचा संसर्ग पसरण्याची शक्यता असलेल्या निष्काळजी कृत्य) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आम्ही लवकरच या प्रकरणातील आरोपींना अटक करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Parkash dhaba Ludhiana. India Serve rat in chicken curry. Restaurant owner bribe the food inspector and go free??? Very poor standards in Kitchen of many Indian restaurants. Be aware . pic.twitter.com/chIV59tbq5
— NC (@NrIndiapolo) July 3, 2023
मात्र दुसरीकडे ढाबा मालकाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ढाबा मालकाने एक व्हिडिओ शूट करुन आपली बाजू मांडली आहे. काही महिन्यांपूर्वी याच ग्राहकाचा ढाब्याच्या व्यवस्थापकाशी बिलात सूट देण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर त्याने ढाब्याची बदनामी करण्याची धमकी दिली, असे ढाब्याच्या मालकाने म्हटलं आहे. कटाचा एक भाग म्हणून विवेक कुमारने हा व्हिडिओ बनवला आणि दावा केला की त्यानेच मटणाच्या ताटात उंदीर टाकला आहे, असे आरोप ढाबा मालकाने लावला आहे.