Viral Video: साप म्हटलं की अनेकांची भंबेरी उडते. त्यात साप समोर आला तर कोणीही असलं तरी भीतीने थऱथर कापू लागतं. सापाने दंश केल्यानंतर जीव वाचणं कठीण असल्याची कल्पना असल्याने कोणीही त्याच्या जवळ जात नाही. सापाच्याही अनेक प्रजाती असून, अनेक ठिकाणी तर त्याची पूजाही केली जाते. महाराष्ट्रातही बत्तीस शिराळा येथे नागपंचमी पूजा करत त्यांना सन्मान दिला जातो. पण अनेकदा साप जीवघेणा आहे हे माहिती असतानाही काहीजण त्याच्याशी जीवघेणी मस्करी करत असतात. त्याला पकडलेला असताना त्याच्यासह फोटो काढताना तर अनेकांना त्याने दंश केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यातच आता एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक लहान मुलगा चक्क खेळण्याप्रमाणे सापाला हातात घेऊन फिरत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. काहींना लहान मुलाचं कौतुक वाटत तर काहींनी मात्र संताप व्यक्त केला आहे.
इन्स्टाग्रामवर एका युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत एक लहान मुलगा हातात जणू काही खोटा साप आहे, अशाप्रकारे त्याची शेपटी पकडून ओढताना दिसत आहे. दरम्यान तो चालत असताना समोऱ घरात काही बायका खाली बसल्याचं दिसत आहे. मुलगा हातात साप घेऊन घरात घुसताच सर्व बायका घाबरुन उभ्या राहतात आणि त्याला पुढे येऊ नको सांगतात. दुसरीकडे मुलगा साप घराच्या उंबरठ्यावर अडकल्याने त्याला ओढत असतो. यानंतर एक व्यक्ती मुलाचा हात पकडते आणि त्याला बाहेर घेऊन जाते. मात्र यावेळीही मुलाच्या हातात साप कायम असतो.
हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्यापासून दीड कोटीपेक्षा अधिक लोकांनी पाहिला असून 6 लाखापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
व्हिडीओ शेअर करण्यात आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. "मी कुटुंबाच्या प्रतिक्रियांना दोष देत नाही," असं एका युजरने म्हटलं आहे. "या पालकांना पुरस्कार दिला पाहिजे. जरी साप हा धोकादायक नसला, तरी त्याला हाताळण्याची योग्य पद्धत नाही. पूर्णपणे दुर्लक्ष," अशी खंत एका युजरने व्यक्त केली आहे.
दरम्यान एका युजरने जी व्यक्ती व्हिडीओ शूट करत आहे, त्याने मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करु नये का? अशी विचारणा केली आहे. तर एकाने हा व्हिडीओ पाहून मला माझ्या एक्सला कुटुंबाची ओळख करुन देतानाचा क्षण आठवला असं उपहासात्मकपणे म्हटलं आहे.
काही युजर्सनी त्याला मोगली म्हटलं असून, जंगल बूक आता विलेज बूक झाल्याची कमेंट केली आहे. तर एकाने सापाला पैसे दिल्याचं म्हटलं आहे.