'तुमच्यासारखे छपरी....,' हॉटेल मालकाने फूड व्लॉगरला हाकलवून लावलं; VIDEO तुफान व्हायरल

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे, ज्यामध्ये हॉटेलचा मालक फूड व्लॉगरला हाकलवून काढतो. मला तुमची गरज नाही असं सांगत तो फूड व्लॉगरला बाहेर काढतो.   

शिवराज यादव | Updated: Oct 27, 2024, 07:25 PM IST
'तुमच्यासारखे छपरी....,' हॉटेल मालकाने फूड व्लॉगरला हाकलवून लावलं; VIDEO तुफान व्हायरल title=

सोशल मीडियाच्या सध्याच्या युगात ज्यांना खूप प्रसिद्धी मिळाली आहे, त्यात फूड व्लॉगरदेखील आहेत. शहरातील वेगवेगळ्या, प्रसिद्ध ठिकाणी जाऊन तेथील पदार्थांचा आस्वाद घेत तो अनुभव फूड व्लॉगर शेअर करत असतात. यामुळे खवय्यांनाही आपल्या पोटाची भूक आणि जिभेची चव पूर्ण करण्यासाठी नेमकं कुठे जावं याचे पर्याय मिळतात. एकीकडे यामुळे फूड व्लॉगरला प्रसिद्धी मिळत असताना दुसरीकडे याचा हॉटेल किंवा रेस्तराँ मालकांना उलट परिणामही भोगावा लागतो. याचाच अनुभव देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हॉटेल मालकाला जेव्हा ग्राहक फूड व्लॉगर आहे समजतं तेव्हा तो चक्क त्याला हाकलवून लावतो. यादरम्यान फूड व्लॉगर आणि हॉटेल मालकादरम्यान झालेला संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

एक्सवर व्हायरल झालेल्या व्हिडीओत व्लॉगर हॉटेलमध्ये जाऊन स्प्रिंग रोलची ऑर्डर देताना दिसत आहे. यावेळी तो स्पिंग रोलची ऑर्डर दिल्यानंतर किती पैसे झाले असं विचारतो. हॉटेल मालकाने 60 रुपये उत्तर दिल्यानंतर तो पैसेही देतो. यानंतर हॉटेल मालक त्याला बसण्यास सांगतो. त्यावर व्लॉगर नकार देत जिथे उभा आहे तिथूनच शुटिंग करण्यास सुरुवात करतो. 

काही वेळाने हॉटेल मालक व्लॉगरला बोलावतो आणि स्पिंग रोलऐवजी त्याचे 60 रुपये परत करतो. काही वेळासाठी व्लॉगरलाही नेमकं काय झालं हे समजत नाही. हॉटेल मालक त्याला जाण्यास सांगतो, यावर तोदेखील नेमकं काय झालं हे समजण्याचा प्रयत्न करतो. यावेळी हॉटेल मालक तू आता छान आहे सांगत घेशील आणि नंतर कोपऱ्यात जाऊन टीका करुन माझ्या हॉटेलची प्रतिमा खराब करशील असं सांगतो. "मी तुमच्यासारख्या लोकांपासून दूर राहतो. माझं स्वत:चं रेस्तराँ चांगलं आहे. मला तुमच्यासारख्या व्लॉगरची गरज नाही," असं तो त्याला सांगतो. यावर तो त्याला पुढच्या हॉटेलात जाऊन खा असंही सांगतो.

या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावर अनेकांनी आपली मतंही नोंदवली आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, 'भावाने स्पिंग रोल मागितला होता, दुकानदाराने त्याचाच रोल केला'.

दुसऱ्याने लिहिलं आहे, “यामध्ये दुकानदाराला पूर्ण पाठिंबा. कोणावरही इथे खाण्यासाठी जबरदस्ती केली जात नाही. परंतु कोणाच्याही व्यवसायाला धक्का लावू नका, विशेषत: जेव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टीत सरकारी समर्थन शून्य असते. एकाने कमेंट केली आहे की, "फूड ब्लॉगर्सनी अनेक छोट्या दुकानदारांचे व्यवसाय उद्ध्वस्त केले आहेत."

“ब्लॉगरला खूप चांगला धडा शिकवला गेला, पण ब्लॉगरचे काय? त्याला यातून आणखी एक चांगली क्लिप मिळाली,” अशी कमेंट एकाने केली.