'बहिणीचं लग्न आहे, कंपनीने अकाऊंट ब्लॉक केलंय,' Zomato डिलिव्हरी बॉय रस्त्यावर रडू लागला, कंपनी म्हणते 'एखाद्याचं...'

एक्सवर एका युजरने झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ शेअर केला आहे. कंपनीने आपलं खात ब्लॉक केल्याचं सांगताना त्याला अश्रू अनावर झाले होते. तसंच काही दिवसांत आपल्या बहिणीचं लग्न असल्याचंही तो सांगत आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 29, 2024, 02:53 PM IST
'बहिणीचं लग्न आहे, कंपनीने अकाऊंट ब्लॉक केलंय,' Zomato डिलिव्हरी बॉय रस्त्यावर रडू लागला, कंपनी म्हणते 'एखाद्याचं...' title=

सोशल मीडियामुळे रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजनाचे तर काही एखादा मुद्दा मांडणारे असतात. दरम्यान एका एक्स युजरने झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये डिलिव्हरी बॉय लहान मुलाप्रमाणे रस्त्यावर रडताना दिसत आहे. कंपनीने आपलं खातं ब्लॉक केलं असल्याचं तो सांगत आहे. तसंच काही दिवसांत बहिणीचं लग्न असून यामुळे आपल्यासमोर फार मोठी अडचण निर्माण झाल्याचं सांगताना त्याला अश्रू अनावर झाले होते. 

दिल्लीच्या जीटीबी नगरमधील हा व्हिडीओ आहे. सोहम भट्टाचार्य नावाच्या युजरने हा व्हिडीओ शूट करत शेअर केला आहे. झोमॅटो डिलिव्हरी बॉयने यावेळी सोहमला आपण काहीच खाल्लेलं नसून, आतापर्यंत कमावलेला सगळा पैसा बहिणीच्या लग्नासाठी साठवून ठेवला होता असं सांगितलं. 

हा तरुण रस्त्यावर भेटणाऱ्या लोकांकडे आर्थिक मदतीसाठी याचना करत होता अशी माहिती सोहमने दिली आहे. सोहमने 28 मार्चला ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा फोटोही जोडला आहे. या पोस्टच्या माध्यमातून सोहमने तरुणाच्या मदतीसाठी जास्तीत जास्त पोस्ट व्हायरल करण्याचं आवाहन केलं होतं. 

पोस्ट शेअर केल्यानंतर फार व्हायरल झाली होती. या पोस्टला 2 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. पोस्ट इतकी व्हायरल झाली की, अखेर झोमॅटोलाही त्याची दखल घ्यावी लागली आहे. 

झोमॅटोच्या एक्स अकाऊंटवर यावर प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे. एखाद्याचा आयडी ब्लॉक केल्यानंतर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याची आपल्याला जाणीव असल्याचं झोमॅटोने म्हटलं आहे. या प्रकरणाची गांभीर्याने पाहणी करु असं आश्वासनही त्यांनी सोहमला दिलं आहे. 

दरम्यान सोहमने डिलिव्हरी बॉयला मदत करण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये क्यूआर कोड शेअर केला असून आपल्या फॉलोअर्सना शक्य तेवढी मदत करण्याचं आवाहन केलं आहे. यानंतर अनेक युजर्सनी त्याला मदत देऊ केली आहे. 

या पोस्टमध्ये सोहमने सांगितलं आहे की, झोमॅटोने खातं ब्लॉक केलं असल्याने हा डिलिव्हरी बॉय रॅपिडोसाठी काम करत आहे. कारण त्याला काही करुन पैसा जमा करायचा आहे.