आसाम : आसामच्या गुवाहाटीमधील दोन मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या दोन मुलांनी त्यांची एक गंभीर चिंता पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली आहे. आमचा दात पडला असून आम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं या पत्राद्वारे या दोन मुलांनी सांगितलं आहे. पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनाही या दोन चिमुकल्यांनी पत्र लिहिलं आहे.
सहा वर्षांची रायसा रावजा अहमद आणि पाच वर्षीय आर्यन अहमद दात तुडल्याने अडचणीत सापडलेत. त्यामुळे त्यांनी आपल्या समस्यांबद्दल पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना कळवण्याचा निर्णय घेतला. या दोन मुलांच्या पत्रांची फेसबुकवरील एक पोस्ट आता व्हायरल झाली आहे.
जेव्हा मुलांचे काका मुख्तार अहमद यांनी पत्र वाचलं, तेव्हा त्यांना आनंद झाला आणि त्यांनी ते आपल्या फेसबुक पेजवर शेअर केलं. दोन्ही मुलांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये पीएम मोदी आणि सीएम सरमा यांचा उल्लेख आहे. 'कृपया आवश्यक ती कारवाई करा' अशी विनंती केली आहे. पत्रांमध्ये असंही लिहिलं आहे की, ते त्यांच्या आवडीचं अन्न योग्य प्रकारे चावू शकत नाहीत.
कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "प्रिय हिमंत बिस्वा सरमा आणि प्रिय नरेंद्र मोदी, माझी भाची रावजा (6 वर्षे) आणि भाचा आर्यन (5 वर्षे) यांचे हे पत्र ... माझ्यावर विश्वास ठेवा, मी घरी नाही, मी ड्युटीवर आहे पण माझी भाची आणि पुतण्याने स्वतःहून लिहिलं असेल. कृपया त्यांच्या दातांसाठी काहीतरी करा कारण ते त्यांच्या आवडीचं अन्न खाऊ शकत नाहीत." ही पोस्ट 25 सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आली होती.
हिमंत बिस्वा सरमा यांनी सहा वर्षांच्या रईसा रावजा अहमद आणि पाच वर्षीय आर्यन अहमद यांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर दिलंय. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी ट्विट केलंय, 'तुमच्यासाठी गुवाहाटीमध्ये चांगल्या दंतवैद्याची व्यवस्था करण्यात मला आनंद होईल. जेणेकरून आपण एकत्र तुमच्या आवडत्या खाण्याचा आनंद घेऊ शकू.'