‘Welcome, buddy ! चंद्रावर चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 मध्ये संवाद; काय झाली चर्चा? ISRO ने दिली माहिती

चांद्रयान- 3 च्या लँडरचं चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरकडून स्वागत करण्यात आलेय. ऑर्बिटर आणि लँडरमध्ये संवाद प्रस्थापित झाला. वेलकम बडी म्हणत इस्त्रोने पोस्ट शेअर केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 21, 2023, 06:26 PM IST
‘Welcome, buddy ! चंद्रावर चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 मध्ये संवाद; काय झाली चर्चा? ISRO ने दिली माहिती  title=

Chandrayaan Landing: भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी टप्प्यात आली आहे. 23 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चंद्रयान-3 चे हे विक्रम लँडर चंद्राच्या कक्षेत आहे. चांद्रयान- 3 च्या लँडरचं चांद्रयान- 2 च्या ऑर्बिटरकडून स्वागत करण्यात आले. ऑर्बिटर आणि लँडरमध्ये संवाद प्रस्थापित झाला. वेलकम बडी म्हणत चांद्रयान- 2 च्या ऑर्बिटरने चंद्रयान-3 च्या विक्रम लँडरचे स्वागत केले आहे. इस्त्रोने या संवादाची पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे.

लँडर उतरण्यासाठी योग्य जागा शोधण्याचं काम करतोय खास कॅमेरा

चांद्रयान 3 कडून आलेले नवे फोटो इस्रोने जारी केलेत. विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. त्याआधी हे फोटो आलेत. विक्रम लँडरवर इस्रोने एक विशेष कॅमेरा बसवलाय. लँडर उतरण्यासाठी योग्य जागा शोधण्याचं काम हा कॅमेरा करतोय. चंद्राच्या पृष्ठभागावरील भली मोठी विवरं, मोठमोठाले खडक हे या कॅमेऱ्यातून दिसत आहेत. अशा चार भल्ल्यामोठ्या विवरांना इस्रोने नावंही दिली आहेत. या नावांसहीत हे फोटो इस्रोने जारी केलेत. विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरेल. हे लँडिंग यशस्वी झालं तर अमेरिका, रशिया आणि चीनपाठोपाठ चंद्रावर लँडर उतरवणारा भारत चौथा देश ठरणार आहे. 

चंद्रावर चंद्रयान-2 आणि चंद्रयान-3 मध्ये चंद्रावर काय संवाद झाला?

14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावले.  श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून दुपारी बरोब्बर 2 वाजून 35  मिनिटांनी रॉकेट चंद्राकडे झेपावलं. LVM 3 या लाँच व्हेईकलमधून चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात आलं. सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण होता. 40 दिवसांच्या प्रवासानंतर  23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे.  चांद्रयानाच्या प्रक्षेपणानंतर सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या आहेत. चंद्रयान-3 मून ऑब्रिटमध्ये असून चंद्रावर असलेल्या चांद्रयान- 2 च्या ऑर्बिटरने याचे स्वागत केले आहे. दोन्ही यान एकमेकांच्या संपर्कात आले. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने ट्विट करून याबाबत माहिती दिली.

चांद्रयान 2 मोहिम ठरली होती अयशस्वी 

 22 जुलै 2019 रोजी चांद्रयान-2 मोहिम राबवण्यात आली. मात्र, 6 सप्टेंबर 2019 च्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर आदळले. लँडिंग फेल झाले. यामुळे चांद्रयान- 2 मोहीम अंशत: अयशस्वी झाली होती. आता भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.