राकेश रोशननंतर इंदिरा गांधींना ममतांनी चंद्रावर पाठवलं! म्हणाल्या, 'त्या चंद्रावर गेल्या तेव्हा...'

Mamata Banerjee Says Indira Gandhi Went To Moon: आपल्या पक्षाच्या विद्यार्थी परिषदेच्या स्थापनादिनानिमित्त दिलेल्या भाषणामध्ये ममता बॅनर्जींनी हे विधान केलं. यापूर्वीही त्यांनी काही दिवसांपूर्वीच असेच एक विधान केले होते.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 30, 2023, 10:51 AM IST
राकेश रोशननंतर इंदिरा गांधींना ममतांनी चंद्रावर पाठवलं! म्हणाल्या, 'त्या चंद्रावर गेल्या तेव्हा...' title=
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमात केलं विधान

Mamata Banerjee Says Indira Gandhi Went To Moon: भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्याऐवजी चुकून चित्रपट दिग्दर्शक राकेश रोशन यांचं नाव घेणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एक गोंधळ घातला आहे. सोमवारी त्यांनी एक गोंधळात टाकणारं विधान केलं आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी चंद्रावर गेल्या होत्या असं ममता यांनी म्हटलं आहे. इंदिरा गांधींच्या सरकारच्या काळात झालेल्या भारताच्या पहिल्या अंतराळ मोहिमेची आठवण करताना ममता बॅनर्जींना, "जेव्हा इंदिरा गांधी चंद्रावर पोहोचल्या तेव्हा त्यांनी राकेश यांना विचारलं की तिथून हिंदुस्तान (भारत) कसा दिसतो असं विचारलं त्यावेळी त्यांनी, 'सारे जहां से अच्छा' असं म्हटलेलं," असं विधान केलं.

ममता कुठे बोलत होत्या?

ममता बॅनर्जी यांनी तृणमूल विद्यार्थी परिषदेच्या (टीएमसीपी) स्थापना दिनानिमित्त एका रॅलीला संबोधित करत होत्या. त्याचवेळी त्यांनी भाषणामध्ये इंदिरा गांधी चंद्रावर गेल्याचा उल्लेख केला. यापूर्वी त्यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतुक करताना पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा उल्लेख राकेश रोशन असा केला होता. यावरुन ममता बॅनर्जी चांगल्याच ट्रोल झाल्या होत्या. यासंदर्भातील अनेक मिम्सही व्हायरल झालेले.

नेमकी ती घटना काय ज्याचा ममतांनी संदर्भ दिला

2 एप्रिल 1984 रोजी रशियन अंतराळयानामधून पृथ्वीच्या कक्षेबाहेर अंतराळात गेलेल्या यानामध्ये असलेल्या राकेश शर्मा यांच्याबरोबर इंदिरा गांधी यांनी संवाद साधला होता. त्यावेळस त्यांनी दिल्लीमधून हा संवाद साधताना भारत कसा दिसतोय अंतराळातून असं राकेश शर्मांना विचारलं होतं. त्यावर राकेश शर्मांनी, 'सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा' असं उत्तर दिलं होतं. 

भारत ठरला पहिलाच देश

भारताने 23 ऑगस्ट रोजी ऐतिहासिक कामगिरी करत चांद्रयान-3 मोहिमेअंतर्गत विक्रम लँडर यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं. अशाप्रकारे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चीन, अमेरिका आणि रशियानंतरचा चौथा तर दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश ठरला.