Republic Day 2024: भारतीयांकडून उद्या म्हणजेच शुक्रवारी संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनी अनेक ठिकाणी ध्वजारोहण केलं जातं. लोकांकडून रस्ते, चौक, सोसायट्यांमध्येही ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन केलं जातं. याशिवाय काही लोक घरातही तिरंगा फडकावतात. गच्ची, बाल्कनीत तिरंगा फडकावत लोकांकडून देशप्रेम व्यक्त केलं जात असतं. पण तिरंगा फडकावताना आपल्या हातून काही चूक होणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा तुमच्या हातून तिरंग्याचा अपमान होऊ शकतो.
राष्ट्रीय सन्मान कायदा, 1971 च्या कलम 3.23 मध्ये राष्ट्रध्वजाच्या फडकवतानाच्या नियमांचा उल्लेख करण्यात आला आहे. घरामध्ये तिरंगा फडकवण्याचे काही खास नियम आहेत. यामधील सर्वात महत्वाची बाब म्हणजे तिरंग्याचा आकार. ध्वजाचा आकार आयताकृती असावा. त्याच वेळी, त्याची लांबी आणि रुंदी गुणोत्तर 3.2 असावी. अशोक चक्रामध्ये 24 प्रहार असावेत. नियमांमध्ये बदल केल्यानंतर आता तुम्ही 24 तास आणि 365 दिवस कोणत्याही निर्बंधाशिवाय झेंडा फडकावू शकता.
जर तुम्ही घरी तिरंगा फडकवत असाल तर फाटलेला किंवा मळकटलेला तिरंगा फडकावू नका. काही कारणाने तुमचा तिरंगा फाटला तर एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन तो नष्ट करा. तसंच तिरंग्यावर काहीही लिहू नका. त्यावर काहीही छापलेलं नसावं. जर तुमच्या घरावर तिरंग्याशिवाय दुसरा ध्वज फडकत असेल तर तो तिरंग्यापेक्षा उंच ठेवू नये हे लक्षात ठेवा. तसंच ते तिरंग्याच्या बरोबरीतही नसावा.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रजासत्ताक दिन संपल्यानंतर तिरंगा तुमच्या गच्चीवरून किंवा बाल्कनीतून उतरवा आणि घडी करुन ठेवा. लक्षात ठेवा की कोणत्याही परिस्थितीत ध्वज जमिनीला स्पर्श होता कामा नये. ध्वजाचा कोणताही भाग जाळल्यास किंवा खराब झाल्यास तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.