Indian Solar Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी शुक्रवारी 'आदित्य L1' संदर्भात महत्त्वाची माहिती दिली. एस सोमनाथ यांनी अहमदाबादमध्ये सांगितलं की, भारताची पहिली सौर मोहीम 'आदित्य L1' 6 जानेवारी रोजी पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या 'लॅग्रेंजियन पॉइंट' (L1) या स्थानावर पोहोचणार आहे. ही मोहीम इस्रोने 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्र (SDSC) मधून प्रक्षेपित केली होती. ही पहिली अंतराळ-आधारित भारतीय वेधशाळा आहे ज्या अंतर्गत 'हॅलो ऑर्बिट एल1' मधून सूर्याचा अभ्यास केला जाणार आहे.
भारतीय विज्ञान परिषदेच्या वेळी सोमनाथ यांनी मिडियाला सांगितले की, "आदित्य एल1 6 जानेवारीला एल1 पॉइंटमध्ये प्रवेश करणार आहे. योग्य वेळी अचूक माहिती जाहीर केली जाईल.'' जेव्हा ते L1 पॉइंटवर पोहोचेल, तेव्हा आम्हाला इंजिन पुन्हा सुरू करावे लागणार आहे. जेणेकरून ते पुढे जाऊ नये. ते त्या बिंदूवर जाईल आणि एकदा ते त्या बिंदूवर पोहोचल्यावर ते त्याच्याभोवती फिरू लागेल.
इस्त्रो प्रमुख सोमनाथ म्हणाले की, ज्यावेळी आदित्य एल1 त्याच्या ठरलेल्या जागी पोहोचेल, तेव्हा पुढील पाच वर्षे सूर्यावर घडणाऱ्या विविध घटनांचा शोध घेण्यास मदत होईल. भारत भविष्यात तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रभावी आणि शक्तिशाली देश बनणार आहे.
इस्रोने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार 'अमृत काल' दरम्यान एक इंडियन स्पेस स्टेशन बांधण्याची योजना आखली आहे, अशी माहितीही सोमनाथ यांनी दिली आहे.
सध्या आदित्य L1 शी संबंधित हे महत्त्वाचे अपडेट समोर आलंय. L1 पॉइंटमध्ये मिशन कोणत्या वेळी प्रवेश करेल हे योग्य वेळी जाहीर केलं जाणार आहे. आदित्य एल1 मिशन 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटामधून प्रक्षेपित करण्यात आलं होतं. भारताला या मिशनकडून मोठ्या अपेक्षा आहेत. केवळ भारतीय नागरिक नाही तर संपूर्ण देशाच्या या मोहिमेवर नजरा आहेत.