Tax Free Income: आर्थिक वर्ष सुरु झालं की संपता संपता करमुक्त गुंतवणूक करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. कर भरण्यापूर्वी गुंतवणुकीचा पुरवा द्यावा लागतो. ज्या लोकांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहेत ते आयकराच्या कक्षेत येतात. पण उत्पन्न कमी असो की जास्त, कुठे कर आकारला जाणार नाही हे माहीत असणं गरजेचं आहे. उत्पन्नाचे काही स्त्रोत असे आहेत की, तिथे कर भरावा लागत नाही. शेतीतून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे. जर तुम्ही एखाद्या फर्ममध्ये भागीदार असाल, तर नफा वाटणी म्हणून मिळणारी रक्कम करमुक्त आहे. कारण, कंपनीने त्यावर आधीच कर भरलेला असतो. कर सूट फक्त नफ्यावरच असते. या व्यतिरिक्त काही गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही कर नसतो, चला तर जाणून घेऊयात
ग्रॅच्युइटी- नोकरदारांना ग्रॅच्युइटीबाबत माहिती असणं गरजेचं आहे. कोणत्याही संस्थेत 5 वर्षे काम केल्यास त्यावर ग्रॅच्युइटी मिळते. गग्रॅच्युइटीची संपूर्ण रक्कम कर सवलतीच्या कक्षेत येते. सरकारी कर्मचाऱ्यासाठी 20 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त आहे. तर, खाजगी कर्मचाऱ्यांसाठी 10 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त आहे.
पीपीएफ गुंतवणूक- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. यामध्ये तुमची गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारे पैसे पूर्णपणे करमुक्त आहेत.
ईपीएफ गुंतवणूक- EPF वर कराचे नियम वेगवेगळे आहेत. असले तरी, सतत 5 वर्षे गुंतवणूक केल्यानंतर काढलेल्या रकमेवर कोणताही कर नाही.
स्वेच्छानिवृत्ती सेवा (VRS)- सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष निवृत्तीपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली तर या रकमेवर ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम करमुक्त आहे. ही सुविधा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे.
HUF कडून मिळालेली रक्कम- आयकर कायद्याच्या कलम 10(2) अंतर्गत, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) कडून मिळालेली रक्कम किंवा कोणत्याही प्रकारची वारसाहक्की रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे.
बातमी वाचा- Gold मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार आहे? या चार गोष्टी लक्षात ठेवा
पालकांकडून मिळालेले पैसे/दागिने/मालमत्ता- आई-वडील किंवा कुटुंबाकडून मिळालेली मालमत्ता, दागिने किंवा रोख रक्कम कराच्या कक्षेत येत नाही. मृत्युपत्रात मिळालेल्या मालमत्तेवरही कर आकारला जात नाही. जर करदात्याला पालकांकडून मिळालेली रक्कम गुंतवून कमवायचे असेल तर त्याला यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागेल.
गिफ्ट कर मुक्त- तसं पाहिलं तर गिफ्ट कराच्या कक्षेत येतात. आयकर कायदा, 1961 च्या कलम 56(2)(x) अंतर्गत प्राप्त झालेल्या भेटवस्तूंवर कर भरावा लागतो. पण लग्न आणि मित्र आणि नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूंवर कोणताही कर नाही. ही भेट 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावी. भेटवस्तू लग्नाच्या दिवशी किंवा त्याच्या आसपासच असाव्यात.
आयकर नियमांनुसार, काही व्यक्तींकडून लग्नसमारंभात मिळालेल्या भेटवस्तूंची किंमत 50,000 रुपयांपेक्षा जास्त असली तरीही ती आयकराच्या कक्षेत येत नाहीत. खाली त्यांची यादी आहे.
1. पती-पत्नीकडून मिळालेली भेट
2. भाऊ आणि बहिणीकडून मिळालेली भेट
3. वडिलांच्या भाऊ किंवा बहिणीकडून मिळालेल्या भेटवस्तू
4. वारसा किंवा मृत्युपत्राद्वारे मिळालेली मालमत्ता
5. कलम 10(23C) अंतर्गत कोणताही निधी/फाउंडेशन/विद्यापीठ किंवा इतर शैक्षणिक संस्था, रुग्णालय किंवा इतर वैद्यकीय संस्था, ट्रस्ट किंवा संस्थेकडून मिळालेली भेटवस्तू
6. कलम 12A किंवा 12AA अंतर्गत नोंदणीकृत कोणत्याही धर्मादाय किंवा धार्मिक ट्रस्टकडून मिळालेली भेट.