भारतात का आहे Covaxin ची कमी? सरकारी व्हॅक्सीन पॅनल प्रमुखांची प्रतिक्रिया

या कारणामुळे भारतीयांना Covaxin लस मिळण्यास होतेय अडचण 

Updated: Aug 3, 2021, 08:14 AM IST
भारतात का आहे Covaxin ची कमी? सरकारी व्हॅक्सीन पॅनल प्रमुखांची प्रतिक्रिया  title=

मुंबई : सरकार यावर्षाच्या शेवटपर्यंत सगळयांचे लसीकरण व्हावे याकडे पूर्ण लक्षकेंद्रीत करत आहे. सरकार याकरता कोविड व्हॅक्सीनच्या उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या एका सल्लागाराने दिलेल्या माहितीनुसार, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच उत्पादन कमी करण्यात आलं आहे. कारण बंगलुरूमध्ये कंपनीच्या नव्या प्लांटमधील पहिल्या काही बॅचची गुणवत्ता योग्य नव्हती. 

दिलेल्या माहितीनुसार, कोविड टास्क फोर्सचे सदस्य एन के अरोरा यांनी कबुल केलं आहे. सरकारला कोव्हॅक्सिनच्या उत्पादनात तेजी येण्याचा विश्वास होता. मात्र कंपनीच्या वैश्विक स्तरावरील सर्वात मोठ्या प्लांटमध्ये क्वालिटीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. कोव्हॅक्सिनच्या लसीची गुणवत्ता कमी असल्याचं समोर आलं आहे. 

Covaxin च्या उत्पादनात घट का? 

डॉ अरोरा यांनी सांगितलं की,'व्हॅक्सीनची निर्मिती हे अगदी रॉकेट सायन्ससारखं आहे. आम्ही Covaxin च्या उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा करत होते. त्याकरता बंगलुरूत एक नवा प्लांट देखील सुरू केला आहे. तसेच इतर तीन सार्वजनिक क्षेत्रातही उत्पादन वाढवण्याबाबत काम सुरू केलं आहे. आम्हाला भारत बायोटेककडून 10 ते 12 करोड लसीची आशा आहे.'

पुढे ते म्हणाले की,'बंगुलुरूमधील प्लांट हा व्हॅक्सीन निर्माण करणारा सगळ्यात मोठा प्लांट आहे. मात्र सुरूवातीच्या काही लसी या गुणवत्ता प्रमाणात योग्य नव्हत्या. पुढच्या दिवसांमध्ये लसीच्या उत्पादनात वाढ केली जाईल. ज्या लसींची क्वालिटी चांगली नव्हती त्यांना अभियानातून बाहेर काढण्यात आलं आहे.'

तिसऱ्या लाटेची अशी तयारी

पुढे ते म्हणाले की,'लसीकरण हे सरकारसाठी सर्वात मोठे प्राधान्य आहे, अशा वेळी जेव्हा देशाच्या काही भागात कोविडची प्रकरणे वाढत आहेत. आणि तज्ञ तिसऱ्या लाटाचा अंदाज लावत आहेत जे ऑक्टोबरमध्ये कधीतरी शिगेला पोहोचू शकते.'  जर भारताला डिसेंबरपर्यंत सर्व प्रौढांना लसीकरण करण्याचे लक्ष्य गाठायचे असेल तर, दररोज सुमारे 10 दशलक्ष लसीकरणासाठी एका महिन्यात 300 दशलक्ष डोसची आवश्यकता असेल. याचा अर्थ भारत बायोटेकला दररोज उत्पादन एक किंवा दोन कोटींवरून 10 कोटींपर्यंत वाढवावे लागेल. डॉ अरोरा यांना विचारण्यात आले की हे शक्य आहे का?