याचं उत्तर द्याच! रेल्वे, हॉटेलांमध्ये फक्त पांढऱ्या रंगाच्याच चादरी का असतात?

White Bedsheet Use in Hotel & Train: सहलीसाठी किंवा मग एखाद्या कार्यक्रमासाठी, निवांत काही क्षण व्यतीत करण्यासाठी बऱ्य़ाचदा आपण छानशा हॉटेलला भेट देतो.   

सायली पाटील | Updated: Jul 4, 2023, 12:40 PM IST
याचं उत्तर द्याच! रेल्वे, हॉटेलांमध्ये फक्त पांढऱ्या रंगाच्याच चादरी का असतात?  title=
why do hotels and trains always have white Bedsheets know interesting facts

White Bedsheet Use in Hotel & Train: कुठे फिरायला गेलं असता ओळखीच्या व्यक्तींच्या घरी राहण्यापेक्षा एखाद्या हॉटेलमध्ये राहण्याचा पर्याय गेल्या अनेक वर्षांपासून बरेचजण निवडत आले आहेत. आपण जिथं जातो तिथं निवांत काही क्षण व्यतीत करत, तिथल्या वातावरणाचा मनमुराद आनंद घेत एखादं सुरेख असं हॉटेल निवडतो. पुढचे काही दिवस हेट हॉटेल आपलं घर होऊन जातं. तुम्हीही असं केलंय ना? एकदातरी केलंच असेल. 

जेव्हाजेव्हा एखाद्या आलिशान किंवा एखाद्या साध्यासुध्या हॉटेलमध्ये जायची वेळ येते तेव्हातेव्हा तिथं गेलं असता काही गोष्टी आपल्याला अगदी एकसारख्याच दिसतात. सोप्या शब्दांत सांगावं तर, एक वेगशळीच साचेबद्धता तिथं पाहायला मिळते. हॉटेलच्या दारं खिडक्यांपासून अगदी तिथं बेडवर असणाऱ्या चादरींपर्यंत बऱ्याच गोष्टी एकसारख्या असतात. आता विषय निघालाच आहे, तर एका रंजक गोष्टीबाबत माहिती करूनच घ्या. तुम्हाला माहितीये का या हॉटेलमध्ये किंवा अगदी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये पांढऱ्या रंगाच्याच चादरी का असतात? 

कारण असं ज्याचा तुम्ही विचारच केला नसेल... 

कोणत्याही हॉटेलच्या रुमचं दार उघडल्यानंतर तिथं असणाऱ्या मऊसूत बेडवर आपण उडीच मारतो. एखाद्या चित्रपटात Slowmo मध्ये अभिनेत्री पडते, अगदी तसंच. पण, तुम्ही एका गोष्टीचं निरीक्षण केलंय का या हॉटेलमध्ये बेडवर असणाऱ्या चादरी, अंगावर घ्यायचे कम्फर्टरही पांढरेच असतात. असं का? 

हॉटेलांमध्ये असणाऱ्या चादरी स्वच्छ करण्यासाठी ब्लीच वापरलं जातं. ब्लिचिंगलाच वापर करून स्वच्छ केल्या जाणाऱ्या चादरी सहसा पांढऱ्या पडतात किंवा त्या गडद रंगांच्या असल्यास त्यांचा रंग उडतो. पांढऱ्या चादरींच्या बाबतीत असं फार क्वचितच घडतं. कारण, त्या शुभ्र असल्यामुळं त्यांचा रंग उडण्याचा प्रश्नच उदभवत नाही. शिवाय ब्लिचिंग वापरून स्वच्छ केल्यामुळं तिच्यातून दुर्गंधीसुद्धा येत नाही. ज्यामुळं हॉटेलांमध्ये 95 टक्के चादरी पांढऱ्याच असतात. 

हेसुद्धा वाचा : Harley Davidson X440 भारतात लाँच; रॉयल एनफिल्डला देतेय टक्कर; किंमतही त्याहून कमी 

हॉटेलमध्ये येणाऱ्या पर्यटक आणि इतर पाहुण्या मंडळींना तिथं येताच निवांत वाटावं यासाठीची वातावरणनिर्मिती करण्याच्या हेतूनंही तिथं पांढऱ्या चादरींचा वापर केला जातो. शिवाय अशा चादरींवर चुकून एखादा डाग लागल्यास तो पटकन लक्षात येतो आणि हॉटेलमधील कर्मचारी तो तातडीनं स्वच्छही करू शकतात. 

पांढरा रंग आणि त्याचं महत्त्वं... 

असं म्हणतात की पांढरीशुभ्र छटा आपल्या मानसिकतेशीही जोडलेली असते. त्यामुळं ताणतणाव कमी होतात. नैराश्य आपल्यापासून चार हात दूर राहतं. या रंगामुळं मनात असणारा कोलाहलही शांत होतो. इतकंच नव्हे तर, ज्यावेळी आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी पर्यटनाच्या हेतूनं जातो तेव्हा तिथं गेलं असता थकवा आणि नकारात्मकता दूर ठेवण्यासही हा रंग मदत करतो. काय मग, थक्क झालात ना या रंगाच्या वापरामागची कारणं ऐकून?