Mhada Lottery 2024 : (Mumbai Homes) मुंबईत हक्काचं घर हे स्वप्न पाहणारे अनेकजण आहेत. पण, या स्वप्नाची पूर्तता करण्याची संधी मात्र या अनेकांमधील काहींनाच मिळते. अशीच या मायानगरीत घर खरेदी करण्याची एक सुवर्णसंधी आता या इच्छुक मंडळींसाठी चालून आली असून, यासाठी मोठी मदत करणार आहे ते म्हणजे म्हाडा. कारण, म्हाडानं आगामी सोडत जाहीर केली असून, त्यासाठीच्या महत्त्वाच्या तारखाही आता समोर आल्या आहेत. (Real Estate)
म्हाडाच्या विविध प्रकल्पांतून आता विविध उत्पन्न गटातील इच्छुकांसाठी 2030 घरांची उपलब्धता या सोडतीच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. म्हाडाच्या या घरांच्या विक्रीसाठी ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 9 ऑगस्ट 2024 पासून सुरुवात होणार असून दुपारी 12 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज भरणा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 13 सप्टेंबर 2024 रोजी ही सोडत (विजेत्यांची नावं) जाहीर केली जाणार आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास Mhada Lottery जाहीर होणार आहे.
म्हाडाच्या सोडतीसाठीची नोंदणी प्रक्रिया 9 ऑगस्ट 2024 ला दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. 4 सप्टेंबर रात्री 11.59 वाजेपर्यंत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरता येणार आहेत. अधिकृत माहितीनुसार अर्जाची प्रारुप यादी 9 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जाहीर होणार असून, त्यानंतर अर्जाची अंतिम यादी 11 सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात येईल. 13 सप्टेंबर रोजी म्हाडाच्या घरांसाठीची सोडत जाहीर केली जाईल.
कुठे उपलब्ध आहेत घरं?
म्हाडाच्या वतीनं यंदाच्या सोडतीमध्ये मुंबईतील गोरेगाव, अँटॉप हिल, कन्नमवारनगर, शिवधाम कॉम्प्लेक्स, कोपरी पवई इथं घरांची उपलब्धता असेल.
म्हाडाच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी http://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन तिथं अर्जनोंदणी करावी. यानंतर अनामत रक्कम जमा करावी. संकेतस्थळावरच अर्जदारांना मार्गदर्शकीय सूचना देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेमध्ये म्हाडानं इच्छुकांना सतर्क करत कोणीही सल्लागार, एजंट अथवा प्रतिनिधी नेमला नसल्याचं सांगत अर्जदारांनी फसव्या प्रलोभनांपासून दूर राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
अत्यल्प गट - 6 लाख रुपये - 359 घरं
अल्प गट - 9 लाख रुपये - 627 घरं
मध्यम गट- 12 लाख रुपये - 768 घरं
उच्च गट - 12 लाखांहून अधिक (या गटाला कमाल मर्यादा नाही)- 276 घरं