मुंबई : कोरोनाची लस घेतल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट मिळतं. जर तुम्ही हे सर्टिफिकेट पाहिलं असेल तर त्यावर तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो दिसतो. सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो का यावरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यावरच केंद्र सरकारने स्पष्टीकरण देत कोरोना लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो का आहे याचं कारण सांगितलं आहे.
राज्यसभेदरम्यान आरोग्य मंत्रालयाने सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदींचा फोटो असण्याचे कारण दिलं आहे. आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांनी राज्यसभेत सांगितलं की, एप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करणं हा कोविडचा प्रसार रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. आणि प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींच्या फोटोसह संदेश असणं हे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास मदत करतं.
त्या पुढे म्हणाल्या, "पंतप्रधानांच्या फोटोसह महत्त्वपूर्ण संदेश लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणं ही सरकारची नैतिक आणि धोरणात्मक जबाबदारी आहे."
डॉ. भारती पवार यांच्या सांगण्यानुसार, Cowin द्वारे नागरिकांना जे सर्टिफिकेट देण्यात येतंय मानक आणि WHO च्या निकषांनुसार आहेत.
लसीकरणानंतर जे प्रमाणपत्र मिळतं, त्यात पंतप्रधान मोदींचा फोटो ठेवला जातो. यासोबतच 'औषध सुद्धा आणि शिस्त सुद्धा'चा संदेशही लिहिला आहे. प्रमाणपत्रावरील पंतप्रधानांच्या फोटोवर अनेक राज्यांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.