श्रद्धासारखाच गेला आणखी एक जीव; पत्नीने मुलाच्या साथीने केले पतीचे तुकडे

Delhi Crime : पूर्व दिल्लीतील पांडव नगरमध्ये सापडलेल्या मानवी शरीराच्या अवयवांचे गूढ दिल्ली गुन्हे शाखेने उकलले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आई-मुलाला अटक केली आहे.

Updated: Nov 28, 2022, 12:53 PM IST
श्रद्धासारखाच गेला आणखी एक जीव; पत्नीने मुलाच्या साथीने केले पतीचे तुकडे title=

Delhi Crime New : दिल्लीतील (Delhi) श्रद्धा वालकर प्रकरणामुळे (Sharda Walker Case) संपूर्ण देश हादरलाय. श्रद्धासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या आफताबने (aftab poonawalla) तिची हत्या करत मृतदेहाचे अनेक तुकडे केले. तब्बल नऊ महिन्यांनंतर हे प्रकरण उघडकीस आलंय. यानंतर आता पुन्हा दिल्लीत श्रद्धा वालकर खून प्रकरणासारखे आणखी एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीची पत्नी आणि मुलाने हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आई-मुलाला अटक केली आहे. या प्रकरणातही हत्येनंतर मृतदेह फ्रिजमध्ये (Refrigerator) ठेवून त्याचे अनेक तुकडे करून हळूहळू पूर्व दिल्ली परिसरात फेकण्यात आले होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आले आहे.

दिल्लीच्या पांडव नगरमध्ये (delhi pandav nagar) हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेने (Crime Branch) पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीला तिच्या मुलासह अटक केली आहे. दोघांनी पतीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले होते आणि रोज गुपचूप एक तुकडा जवळच्या ग्राऊंडमध्ये फेकत होते. अवैध संबंधातून ही घटना घडल्याचे आता समोर आले आहे.

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे पूनम आणि दीपक अशी असून त्यांनी अंजन दास यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. अवैध संबंधांमध्ये अडसर ठरत असलेल्या अंजन दास यांची नशेच्या गोळ्या खायला घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर दोघांनी मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवले होते. पोलिसांनी आता तो फ्रिजही जप्त केला आहे.

दिल्ली पोलिसांना 5 जून रोजी, गस्त घालताना पांडव नगरच्या 20 ब्लॉक कल्याणपुरी समोरील रामलीला मैदानावरील झुडपातून दुर्गंधी येत असल्याचे दिसले. ही माहिती तात्काळ पांडवनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना मानवी अवयवांनी भरलेली पिशवी सापडली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता हा सर्व प्रकार उघडकीस आलाय. या मैदानाजवळ एक महिला आणि एक तरुण संशयास्पदरित्या सातत्याने आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.