Video: आजारी पत्नीसाठी VRS, पण पतीच्या निवृत्ती सोहळ्यातच तिने प्राण सोडले! मृत्यूपूर्वी म्हणाली, 'मला..'

Woman Collapses Dies At Retirement Party of Husband: हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 26, 2024, 08:11 AM IST
Video: आजारी पत्नीसाठी VRS, पण पतीच्या निवृत्ती सोहळ्यातच तिने प्राण सोडले! मृत्यूपूर्वी म्हणाली, 'मला..' title=
घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला आहे

Woman Collapses Dies At Retirement Party of Husband: राजस्थानमधील कोटा येथे एक फारच धक्कादायक प्रकार घडला असून सध्या ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे. येथील एक महिला तिच्या पतीच्या निवृत्ती समारंभाच्या कार्यक्रमामध्येच बसल्या बसल्या मरण पावली. पतीच्या निवृत्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेली ही महिला पतीच्या बाजूला बसलेली असताना अचानक तिला अस्वस्थ वाटू लागलं. इतरांना या महिलेला काय झालं आहे हे कळण्याआधीच तिचा मृत्यू झाला. हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला आहे. 

व्हिडीओत आहे काय?

व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडीओमध्ये आधी सदर महिला तिच्या पतीच्या बाजूला बसून हसताना दिसत आहे. मात्र अचानक या महिलेला अस्वस्थ वाटू लागतं आणि ती मागे असलेल्या खुर्चीवर बसताना दिसते. पती तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो. इतरांनाही या महिलेला काहीतरी झाल्याचं जाणवतं. अनेकजण तिच्या आवतीभोवती गर्दी करतात. कोणी मदतीला हात पुढे करतं तर कोणी विचारपूस करण्यासाठी आलेलं असतं. मात्र तेथे उपस्थित असलेल्या कोणाला काही कळण्याआधीच ही महिला बसल्या जागी प्राण सोडते आणि समोरच्या टेबलवर देह झोकून देते. 

पत्नीची काळजी घेण्यासाठीच सोडलेली नोकरी

या महिलेची शुद्ध हरपली आहे असं समजून तिला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असता दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. या महिलेच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या तपशीलानुसार, मरण पावलेल्या महिलेचं नाव टीना संदल असं आहे. टीना यांचे पती देवेंद्र संदल हे सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशनमध्ये कार्यरत होते. टीना यांना हृदयासंदर्भातील समस्या असल्याने पत्नीची काळजी घेण्यासाठी देवेंद्र यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली होती. मात्र पतीच्या निवृत्ती सोहळ्यातच टीना यांनी प्राण सोडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हे ठरले शेवटचे शब्द...

निवृत्ती सोहळ्यामध्ये संदल दांम्पत्याला हार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर कर्मचारी फोटो काढत असताना अचानक टीना यांना चक्कर आली. "मला चक्कर येत आहे," असं म्हणत टीना खुर्चीवर बसल्या. त्यांच्या पतीने त्यांची पाठ चोळण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्यांनी 'पाणी, द्या पाणी!' म्हणत पाण्याचा ग्लास पुढे केला. मात्र त्यापूर्वीच टीना यांनी प्राण सोडले होते.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टीना आणि त्यांचे पती देवेंद्र यांच्या सोबतीचा असा दुर्देवी अंत झाल्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x