प्रियंका गांधी या लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत

यामुळे काँग्रेसचं नुकसान होऊ शकतं का?

Updated: Feb 14, 2019, 02:30 PM IST
प्रियंका गांधी या लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा काही दिवसातच होणार आहे. सगळेच पक्ष आधीच कामाला लागले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीका सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशवर राजकीय पक्षांचा डोळा आहे. सध्या उत्तर प्रदेशमधील राजकीय चित्र जे आहे त्यानुसार लोकसभा निवडणुकीत एनडीए, सपा-बसपा आघाडी आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. युपीत यश मिळवण्यासाठी काँग्रेसने आता कंबर कसली आहे. इतकच नाही तर इतक्या दिवसापासून सक्रीय राजकारणात नसलेल्या प्रियंका गांधी-वाड्रा यांना देखील आता सक्रीय राजकारणात आणलं आहे. युपीमध्ये त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पण प्रश्न असा आहे की काय प्रियंका गांधी या लोकसभा निवडणूक लढवतील का?

याआधी देखील अनेकदा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रियंका गांधी यांनी राजकारणात सक्रीय व्हावं आणि निवडणूक लढवावी अशी मागणी होत होती. प्रियंका गांधी सक्रीय राजकारणात आल्या असल्या तरी निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्राथमिकता ही ग्राऊंड लेवलवर काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याची असल्याचं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. सध्या त्यांचं संपूर्ण लक्ष हे निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यावर आहे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

प्रियंका गांधी या निवडणूक लढवणार का असा प्रश्न भाजपसह इतर पक्षाच्या नेत्यांना देखील पडला असेल. प्रियंका गांधी यांनी फूलपूर किंवा वाराणसी किंवा इलाहाबाद मधून निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.  प्रियंका गांधी या आता काँग्रेसच्या महासचिव आहेत. त्यांना पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ४१ जागांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. प्रियंका गांधी यांना येथे अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. 

२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी कशी होती यावर एक नजर टाकली तर, काँग्रेसने युपीमध्ये ८० जागा लढवल्या होत्या पण फक्त सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचाच विजय झाला होता. ८० पैकी फक्त २ जागा काँग्रेसला मिळाल्य़ा होत्या. आता सपा-बसपा एकत्र निवडणूक लढत असल्याने याचा देखील फटका काँग्रेसला बसू शकतो.