नवी दिल्ली : येस बँकवर निर्बंध लादण्यात आल्यानंतर खातेधारकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, खातेदार संपूर्ण महिन्यात ५० हजारांहून अधिक रक्कम काढू शकत नसल्याचं सांगितलं. परंतु काही उपायांचा आधार घेत खातेदार येस बँकेच्या खात्यातून ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतात.
आरबीआयकडून जाहिर करण्यात आलेल्या आदेशात, वैद्यकीय खर्चासाठी पाच लाख रुपयांपर्यंत बँकेतून पैसे काढता येऊ शकतात. या नियमांतर्गत खातेधारक किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याचा इलाज सुरु असल्यास, या नियमानुसार सूट देण्यात आली आहे.
आरबीआयने, खातेधारकाच्या घरी लग्नसमारंभ असल्यास तो या नियमांनुसार, पैसे काढण्यास पात्र असणार असल्याचं सांगितलं आहे. त्यासाठी लग्नपत्रिका, प्रतिज्ञापत्रांसह (affidavit) बँकेत जमा करावी लागेल.
खातेदारांना शिक्षणासाठी सरकारने सवलत दिली आहे. खातेधारक मुलांच्या शिक्षणासाठी दिली जाणारी फी भरण्यासाठीदेखील ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतो.
येस बँकच्या १००० ब्रांच आणि १८०० एटीएम आहेत. संपूर्ण देशभरात येस बँकेचे २९ लाख ग्राहक आहेत.
येस बँकेच्या ग्राहकांना पुढच्या महिनाभरात ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. ५ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता हे आदेश देण्यात आले आहेत. ३ एप्रिल २०२० पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. केंद्रीय अर्थखात्याने याबाबतचं नोटीफिकेशन काढलं आहे. वाढत्या कर्जाच्या बोज्यामुळे येस बँक अडचणीमध्ये आली आहे.
आरबीआय आणि केंद्र सरकारने येस बँकेचं संचालक मंडळही ३० दिवसांसाठी बरखास्त केलं आहे. या ३० दिवसांमध्ये एसबीआयचे माजी डीएमडी आणि सीएफओ प्रशांत कुमार येस बँकेचा कारभार पाहतील.