Bank Loan Transfer: भारतीय रिझर्व्ह बँकेनं नुकतंच आपल्या रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे बँकांनी तातडीने पावलं उचलत आपल्या कर्जदारांच्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते महाग झाले आहेत. जर तुम्हालाही कर्जाचे हप्ते फेडणं महाग वाटत असेल आणि बँकेच्या सर्व्हिसबाबत तक्रार असेल, तर दुसऱ्या बँकेत कर्ज हस्तांतरित करू शकता. काही बँका तुमच्या बँकेपेक्षा कमी व्याजदरात कर्ज देत असेल तर लगेच पावलं उचला. त्यामुळे तुमच्या व्याजावर काही प्रमाणात बचत होऊ शकते. यासाठी तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. कर्ज जुन्या बँकेकडून नव्या बँकेकडे कसं ट्रान्सफर करायचं जाणून घ्या.
कर्ज हस्तांतरण कसे करावे
कर्ज हस्तांतरित करण्यासाठी, तुम्हाला एक नवीन बँक निवडावी लागेल. जुन्या बँकेकडे फोरक्लोजर अर्ज करावा लागेल. त्याचबरोबर अकाउंट स्टेटमेंट आणि प्रॉपर्टीची कागदपत्रं घ्यावी लागतील. त्यानंतर कागदपत्रं नवीन बँकेत सादर करावी लागतील. तसेच जुन्या बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागेल. हे प्रमाणपत्र नव्या बँकेत सादर करावं लागेल. नव्या बँकेत कर्ज ट्रान्सफर करताना 1 टक्का प्रोसेसिंग फी द्यावी लागते, ही बाब लक्षात ठेवा.
नव्या बँकेला ही कागदपत्रं द्यावी लागणार
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवी बँक तुमच्या जुन्या बँकेकडून मंजुरीपत्र घेईल आणि त्या आधारावर तिथलं लोन अकाउंट बंद होईल. त्याचबरोबर नव्या बँकेसोबत कॉन्ट्रॅक्ट साइन करावं लागेल. तसेच बँकेची फी जमा करावी लागेल. त्यानंतर नव्या बँकेत कर्जाचे हप्ते भरू शकता.