आग्रा : भारतीय सैन्यात भरती होण्याचे त्याचं स्वप्न होते. मात्र, पाच वेळा प्रवेश परीक्षा दिली. परंतु त्यात त्याला यश आले नाही. पाचवेळा प्रयत्न करुनही भारतीय लष्करात भरती न होऊ शकल्याने नाराज झालेल्या २४ वर्षीय तरुणाने फेसबुकवर लाईव्ह आत्महत्या केली. तरुणाने आत्महत्या करताना फेसबुकवर लाईव्ह करत आपल्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केले. धक्कादायक म्हणजे तरुण फेसबुक लाईव्ह आत्महत्या करत असताना चक्क २७५० जण पाहत होते.
मुन्ना कुमार याने फेसबुकवर नैराश्यातून आत्महत्या केली. मुन्ना कुमार बीएससी ग्रॅज्युएट असून आग्रा येथील शांतीनगरमधील रहिवासी आहे. बुधवारी सकाळी फेसबुकवर एक मिनिट नऊ सेकंदाचा व्हिडीओ शेअर करत आपण आत्महत्या करत असल्याचं त्याने सांगितलं. त्याचा हा व्हिडीओ २७५० जण पाहत होते. त्याला रोखण्याचा प्रयत्न न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हे प्रकरण आग्रामधील न्यू आग्रा पोलीस स्टेनच्या रेणुका विहार कॉलनीत घडले. बीएससी उत्तीर्ण तरुण मुन्ना कुमार हा सैन्यात नोकरी लागण्यासाठी प्रयत्न करत होता. सैन्यात नोकरी करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, सैन्यात नोकरी करण्याचे वय त्याचे संपत होते. त्यामुळे तो तणावात होता. तो जीवनाची लढाई गमावून बसला. तो नेहमी उदास राहायचा. या नैराशात त्याने स्वत:ला संपवून टाकले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठीही लिहीली आहे.
दोन पानांच्या सुसाईडनोटमध्ये त्याने आपल्या आई-वडिलांची माफी मागितली आहे. मी आई-वडिलांचा वेदना दिल्या आहेत. तसेच त्याने शेवटी जय हिंद असे या चिठ्ठीत लिहिलेय. ज्यावेळी घरातील सदस्य झोपी गेले त्यावेळी त्याने आत्महत्या करण्याची तयारी सुरु केली. त्याने फाशी लाईव्ह करत व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला. फेसबुकवर व्हिडिओ पाहिल्यानंतर ही घटना उघड झाली. मुन्नाच्या आत्महत्येमुळे घरातील लोकांना जबर धक्का बसलाय.