ठाण्याच्या कृष्ण मंदिरातील चोर पकडला, पोलिसांच्या टीमला १० हजारांचे बक्षीस

अवघ्या आठ तासांमध्ये पोलिसांनी चोराला जेरबंद केले. 

Updated: Sep 2, 2018, 08:20 PM IST

ठाणे: ठाण्याच्या श्रीकृष्ण मंदिरात रविवारी सकाळी झालेल्या चोरीचा पोलिसांनी अवघ्या आठ तासांत छडा लावला आहे. ऐन गोकुळष्टामीच्या दिवशी ठाण्याच्या श्रीकृष्ण मंदिरात दरोडा पडल्याने भाविकांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. मात्र, कृष्णजन्माच्या आधी चोर शोधूनच काढू, असे आश्वासन पोलिसांनी दिले. अखेर वेगवान हालचाली करुन अवघ्या आठ तासांमध्ये पोलिसांनी चोराला जेरबंद केले. चोराकडून ४० लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पोलिसांच्या टीमला दहा हजारांचे बक्षीस जाहीर केले. 

आज सकाळी चोरी झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत तपासाला सुरुवात केली होती. चोरट्यांनी सीसीटीव्ही बंद करुन चोरी केल्यामुळे पोलिसांकडे कोणताही धागादोरा नव्हता. मात्र, खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी चोरी करणाऱ्या टोळीचा माग काढला. या टोळीत एका महिलेचाही समावेश असल्याचे समजते. पोलिसांकडून उर्वरित चोरांचा शोध सुरु आहे. दरम्यान, ठाण्यातील नागरिकांकडून पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.