Parenting Tips: मुलं दिवसभर मोबाईल पाहतात, होऊ शकतो Myopia; अशी सोडवा 'ही' सवय

Parenting tips: दिवसभर मोबाईल बघणे ही बाब अतिशय धोकादायक आहे. मुलांची 'ही' सवय आताच सोडा नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 5, 2024, 10:08 AM IST
Parenting Tips: मुलं दिवसभर मोबाईल पाहतात, होऊ शकतो Myopia; अशी सोडवा 'ही' सवय title=

Myopia Symptoms and Treatment: टेक्नॉलॉजीमुळे मुलांच्या जीवनात मोठे बदल झाले आहेत. आताची लहान मुलं अगदी जन्माला येताच टेक्नॉलॉजी आणि स्क्रिनशी जोडले जातात. पहिल्यासारखी मुलं आता गल्लीबोळात खेळताना दिसत नाही. मोकळ्या जागी ही मुलं बसली तरीही त्यांच सगळं लक्ष मोबाईलचे अडकलेलं दिसतं. 

कोविड 19 नंतर मुलांचा अभ्यासही मोबाईलशी जोडला गेला. असं असताना मुलं मोबाईलच्या जास्त जवळ आले. अगदी लॅपटॉप आणि मोबाईल या सगळ्या गोष्टी दिनक्रमातील अविभाज्य गोष्टी झाल्या. असं असताना आता मुलं दिवसातील सर्वाधिक काळ हा स्क्रिनसमोर घालवतात. 

मुलांचा स्क्रिन टाईम वाढल्यामुळे त्यांच्यामध्ये लठ्ठपणा वाढला आहे. तसेच अनेक मुलांना लहान वयातच चष्मा लागला आहे. एवढंच नव्हे तर मुलांवर स्क्रिन टाईमचा एवढा परिणाम होतोय की, यामुळे त्यांना मायोपियाची समस्या जाणवत आहे. याचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे अगदी लहान वयातच मुलांना भिंगाचा चष्मा लागत आहे. अशावेळी काही गोष्टींची पालकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 

मायोपिया म्हणजे काय? 

मायोपिया म्हणजेच Nearsightedness ही एक समस्या आहे. ज्यामध्ये जवळच्या वस्तू स्पष्टपणे दिसतात, परंतु दूरच्या वस्तू पाहण्यात खूप अडचण येते. मायो क्लिनिकच्या मते, मायोपियाची (Myopia)  समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा डोळ्यांचा आकार किंवा डोळ्यांचा काही भाग बदलतो. ज्यामुळे प्रकाश अपवर्तन सुरू होतो, म्हणजेच तो वाकू लागतो. यामुळे, रेटिनाच्या मागे लक्ष केंद्रित करण्याऐवजी, प्रकाश समोर केंद्रित होऊ लागतो, ज्यामुळे दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. मायोपियाची समस्या सामान्यतः बालपणापासून सुरू होते, ज्यामागे आनुवंशिकता आणि जीवनशैली दोन्ही महत्त्वाची भूमिका बजावतात.

मायोपियाची लक्षणे

  • दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसतात
  • वारंवार डोळे चोळणे
  • डोळे बारीक करुन पाहणे
  • सतत डोळे उघड झाप करणे 
  • डोकेदुखी
  • डोळ्यावरील ताण
  • डोळा दुखणे
  • वाचताना किंवा टीव्ही पाहताना पुस्तक किंवा स्क्रीनकडे खूप बारकाईने पाहणे

मायोपिया कसा टाळायचा?

  • मुलांचा स्क्रीन वेळ कमी करा. त्यांना खेळण्यासाठी बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करा. फोन किंवा लॅपटॉपवर गेम खेळू देऊ नका. तसेच, जेवताना किंवा त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांचा फोन वापर कमीत कमी मर्यादित करा. त्याचप्रमाणे, ते किती वेळ टीव्ही पाहतात आणि ते पाहण्यासाठी कुठे बसतात हे लक्षात ठेवा. स्क्रीन टाइम कमी केल्याने मायोपियाचा धोका कमी होतो.
  • डोळे निरोगी ठेवण्यासाठी योगा करा. अशी अनेक योगासने आहेत. ज्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि त्याच्याशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.
  • अंधारात तुमचा फोन वापरू नका. तसेच, जेव्हा ते अभ्यास करतात तेव्हा खोलीत भरपूर प्रकाश असल्याची खात्री करा. अंधारात वाचू नका.
  • त्यांच्या डोळ्यांची नियमित तपासणी करा. विशेषत: तुमच्या कुटुंबातील एखाद्याला मायोपियाची समस्या असल्यास. आनुवंशिकतेमुळेही त्याचा धोका वाढतो. याशिवाय, नियमित तपासणीमुळे हा आजार लवकर ओळखण्यास मदत होते.