दातांचा अन् Heart Attack चा थेट संबंध! संशोधकांचा दावा; समजून घ्या नेमकं कनेक्शन

Teeth And Heart Disease Link: तुम्हाला हा संबंध ओढून ताणून जोडण्यात आला आहे असं वाटत असेल तर तुम्ही वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण संशोधकांनी या दोघांचा काय आणि कसा संबंध असतो हे सांगितलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 12, 2024, 03:38 PM IST
दातांचा अन् Heart Attack चा थेट संबंध! संशोधकांचा दावा; समजून घ्या नेमकं कनेक्शन title=
अभ्यासाच्या अहवालामध्ये दिली सविस्तर माहिती

Link Between Tooth Loss And Fatal Heart Disease: दात तुटणे किंवा पडणे हे कायमच व्यथित करणारं असतं. खरं तर दातांसंदर्भातील खर्च पाहिले तर खरोखरच आपले दात मौल्यवान का आहेत हे सहज समजतं. एकदा डेंटीस्टकडे गेलं की खिसा हलका झालाच समजा. अर्थात दातांसंदर्भातील काम फार नाजूक असतं आणि ते करण्यासाठी विशेष प्रशिक्षक घ्यावा लागतं. त्यामुळेच डेंटीस्टची ट्रीटमेंट ही अधिक महाग असते. पण केवळ पैसे वाचवण्यासाठी नाही तर नुकत्याच समोर आलेल्या संशोधनाबद्दल वाचलं तर तुम्ही तुमच्या आरोग्यासंदर्भातूनही दातांची काळजी घेणं अधिक महत्त्वाचं आहे असं तुम्हाला जाणवेल. तुमच्या दाताचं आरोग्य आणि हृयविकाराच्या झटक्याचा थेट संबंध असल्याचं एका अभ्यासात समोर आलं आहे.

अनेक विद्यापीठांचा समावेश

अनेक विद्यापीठांनी एकत्र येऊन केलेल्या संशोधनामध्ये दात आणि हृदयविकाराचा काय संबंध असतो हे स्पष्ट झालं आहे. मेरीलॅण्ड विद्यापीठ, बेलगार्ड विद्यापीठ, शाहजा विद्यापीठ, कॅसे वेस्टर्न रिझर्व्ह विद्यापीठ आणि इतर विद्यापीठांचा समावेश आहे. या अभ्यासाचा अहवाल जर्नल ऑफ एंडोडोंटीक्स नावाच्या नियतकालिकेमध्ये छापून आला आहे. खरं तर दात तुटणे आणि हृयविकाराचा झटक्याचा थेट संबंध असल्याचं दर्शवणारं संशोधन यापूर्वीही अनेकदा झालं आहे. अनेक अभ्यासांमध्ये दात तुटण्याचा हृदयविकाराशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. मात्र काही अभ्यासांमध्ये या दोघांचा काही संबंध नसल्याचं समोर आलं. 

ओढून ताणून संबंध नाही तर असा होऊ शकतो धोका

आता दात तुटल्याने हृदयविकाराचा झटका कसा येऊ शकतो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल किंवा हे सारं ओढून ताणून संबंध जोडण्यासारखं आहे असं वाटत असेल तर याचा संबंध समजावून सांगण्यात आला आहे. दात तुटल्यानंतर ती पोकळी त्याच्या जागी जबड्यामध्ये निर्माण होते तेथून रक्ताच्या माध्यमातून काही विषाणू शरीरामध्ये प्रवेश करु शकतात. त्यामुळे आरोग्यासंदर्भातील समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दात तुटणे ही केवळ दातांची समस्या नाही

"दात तुटणे ही केवळ दातांसंदर्भातील समस्या नाही असं आम्हाला दिसून आलं आहे. दात तुटण्याचा किंवा पडण्याचा संबंध थेट जीवघेण्या हृदयविकाराच्या झटक्याशी जोडता येईल, असं दिसून आलं आहे," अशी माहिती अभ्यासकांपैकी एक असलेल्या अनिता अमोशेरिया यांनी दिली आहे. कॅसे वेस्टर्न रिझर्व्ह विद्यापीठच्या वेबसाईटवरील रिपोर्टमध्ये अनिता यांचं हे विधान देण्यात आलं आहे. 

जास्त दात पडणाऱ्यांना हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता अधिक

ज्या लोकांचे अधिक दात पडलेले असतात त्यांना हृदयविकाराचा धोका हा 66 टक्क्यांनी वाढतो. कमी दात पडलेल्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो. या संशोधनामध्ये अभ्यासकांनी सदर विषयावर झालेल्या आधीच्या 12 संशोधनांचाही अभ्यास केला. 

इतर घटकांचाही परिणाम

अर्थात यामध्ये इतरही अनेक गोष्टींचा समावेश होतो. ज्यामध्ये धुम्रपान, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक असणं, वय यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. मात्र दातांशी हृदयविकाराचा संबंध असतो हे नव्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.