...तर महाराष्ट्रात लागू होणार Right To Disconnect! प्रायव्हेट सेक्टर कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा

Maharashtra Assembly Election Big News For Private Sector Employees: विशेष म्हणजे हे धोरण काही महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये लागू करण्यात आलं असून हे कर्मचाऱ्यांसाठी फारच महत्त्वाचं आणि फायद्याचं धोरण ठरत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 11, 2024, 09:21 AM IST
...तर महाराष्ट्रात लागू होणार Right To Disconnect! प्रायव्हेट सेक्टर कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा title=
जाहीरनाम्यात यासंदर्भातील उल्लेख (प्रातिनिधिक फोटो)

Maharashtra Assembly Election Big News For Private Sector Employees: शेतकरी, महिलांबरोबरच बेरोजगारांसाठीही अनेक पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये विशेष तरतुदींचा समावेश दिसून येत आहे. मात्र महाविकास आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सर्वात मोठं आश्वासन दिलं आहे. कोरोनानंतरच्या काळात घरुन काम करण्यास प्राधान्य देताना अनेक खासगी कर्मचाऱ्यांना वेठीस धरलं जातं. कर्मचाऱ्यांनी 24 तास उपलब्ध असण्याची अपेक्षा आता कंपन्यांकडून केली जाते. वर्क फ्रॉम होममुळे वर्किंग अवर्सची संकल्पनाच कालबाह्य झाली आहे. आता कोरोनानंतर कार्यालये पुन्हा सुरु झाली असून ऑफिसला जाऊन काम करत असले तरी 24 तास कर्मचारी उपलब्ध हवेत अशी अनेक कंपन्यांची मागणी असते. मात्र याच जाचा पाहून कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी नवं धोरण राबवलं जाईल असं महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे. 

नेमकं हे धोरण काय?

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये 'राईट टू डिस्कनेक्ट'चा सविस्तर उल्लेख आहे. 'राईट टू डिस्कनेक्ट' म्हणजेच कामाच्या तासांनंतर कर्मचाऱ्यांना ऑफिससंदर्भातील मेल, मेसेज किंवा कॉलला प्रतिसाद न देण्याचा अधिकार देणे. ऑफिस अवर्सनंतर ऑफिससंदर्भात काम नाकारण्याचा अधिकार 'राईट टू डिस्कनेक्ट'अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतो. ऑफिस अवर्सनंतर काम नाकारल्यानंतरही कंपन्यांना कर्मचाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही. हे धोरण अनेक कर्मचाऱ्यांना दिलासा देणार ठरु शकतं. सध्या कामाच्या नावाखाली अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांच्या खासगी वेळेतही त्यांना डिजीटल माध्यमातून कामाला लावतात. कधी मेललाच रिप्लाय करणे किंवा ऑनलाइन मिटींग अटेंड करणे यासारखी अलिखित बंधनं कामाच्या तासांनंतरही घातली जातात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना खासगी आयुष्यात घरच्यांना, कुटुंबियांना वेळ देता येत नाही अशी तक्रार ऐकायला मिळते. या सर्वांवर 'राईट टू डिस्कनेक्ट'च्या माध्यमातून सर्वांना सोयीस्कर असा उपाय काढता येणार आहे.

'राईट टू डिस्कनेक्ट'बद्दल मविआच्या जाहीरनाम्यात काय म्हटलंय?

"डिजिटल कार्यसंस्कृतीमुळे कामीच वेळ, ठिकाण या गोष्टी अर्थहीन ठरत आहेत. 24 तास कर्मचारी उपलब्ध होऊ शकतो, यामुळे कामच्या वेळेव्यतिरिक्तही त्याचे श्रम वापरले जातात. याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो. तसेच कौटुंबिक स्वास्थ्यही धोक्यात येते. हा ताण कमी करण्यासाठी कामाच्या वेळेव्यतिरिक्त कर्मचाऱ्याला मेल, मेसेजेस याला उत्तर देणे बंधनकारक नसेल. त्याची ही कृती बेजबाबदारपणाची आणि शिस्तबंघाचीही ठरणार नाही. यासाठी 'राईट टू डिस्कनेक्ट' या धोऱणाची आवश्यकता आहे. मानवी हक्काच्या दृष्टीने असे धोरण देशात सर्वप्रथम राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल," असा 'राईट टू डिस्कनेक्ट'संदर्भातील उल्लेख महाविकास आघाडीच्या 48 पानी जाहीरनाम्यातील 33 व्या पानावर आहे. 

ऑस्ट्रेलियामध्ये लागू झालाय हा कायदा

ऑस्ट्रेलियामध्ये काही महिन्यांपूर्वीच 'राईट टू डिस्कनेक्ट' कायदा लागू झाला असून आता कर्मचाऱ्यांना वर्किंग अवर्सनंतर कॉल करणं, मेसेज करणं कंपन्यांना महागात पडू लागलं आहे. कंपन्यांना कर्मचाऱ्यांना ऑफिस अवर्सनंतर काम सांगता येणार नाही. तसेच असं केलं तर त्यांच्याविरोधात थेट कोर्टात जाण्याचा हक्क कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.