DIY For Old Sarees: साड्या जुन्या झाल्या किंवा खूपदा त्याच त्याच साड्या वापरुन कंटाळा आला की एकतर त्या साड्या महिला कोणाला तरी देऊन टाकतात किंवा बोहारणीला देऊन त्यावर भांडी घेतात. मात्र कधी कधी काही साड्या इतक्या आवडत्या असतात की त्यांना कोणाला देऊन टाकायचीही इच्छा होत नाही. तसंच, काही साड्यांच्या आठवणीही खास असतात. अशावेळी या जुन्या साड्यांना तुम्ही हटके व ट्रेंडी लुक देऊन पुन्हा परिधान करु शकता. कसं ते जाणून घेऊया.
आईच्या लग्नातील साडी कितीही जुनी झाली तरी ती टाकून द्यावीशी वाटत नाही. अशावेळी ती साडी मुलीकडे किंवा सुनेकडे जाते. पण खूप वर्ष न वापरल्यामुळं साडी जीर्ण होऊ शकते. अशावेळी ती फेकून देता वेगळ्या पद्धतीनेही तुमच्याकडे ठेवू शकता. वेगळ्या पद्धतीने व थोड्या हटके पद्धतीने तुम्ही या साड्यांचा पुर्नवापर करु शकता. या फेस्टिव्ह सिझनमध्ये तुम्ही एक वेगळा लुक ट्राय करुन तुमच्या आवडत्या साड्या पुन्हा वापरु शकता.
एथनिक सूटः जुन्या साड्यांचा तुम्ही तुमच्यासाठी स्ट्रेट, ए लाइन किंवा अनारकली सूट शिवून घेऊ शकता. जर तुमच्याकडे बनारसी, कांचीपुरम किंवा पैठणी साड्या असल्यास त्याचे सूट खूप सुंदर दिसतात.
दुप्पटाः साड्यांचे दुप्पटादेखील खूप छान शोभून दिसतात. जर तुमच्याकडे जॉर्जेट किंवा शिफॉनची साडी साडी असेल त्यापासून शरारा किंवा दुप्पटा बनवू शकता. हे दुप्पटे तुम्ही कुर्तीवर घेऊ शकता. तसंच, खणाची साडी असेल तर त्याचाही दुप्पटा तयार करुन प्लेन पांढरा किंवा काळ्या रंगाच्या कुर्तीवर घेऊ शकता.
कुशव कव्हरः तुमच्याकडे बनारसी साडी असेल आणि त्याला छान मोठे काठ असतील ते काठ कापून घ्या आणि शिफॉन आणि जॉर्जेटच्या साडीवर लावून घ्या. तसंच, उरलेल्या काठापासून उशीचे अभ्रे तयार करु शकता. तसंच, दुप्पटा व कापडाच्या पिशवीही बनवू शकता.
फ्लेयर्ड स्कर्टः तुमच्याकडे ब्रोकेड किंवा चंदेरी सिल्क साडी असेल आणि ती तुमची खूपच आवडती असेल तर त्या साडीपासून तुम्ही फ्लेयर्ड स्कर्ट बनवू शकता. परफेक्ट इंडो वेस्टर्न लुकसाठी तुम्ही प्लेन टॉप किंवा फॉर्मल शर्टवर परिधान करु शकता.
ट्यूनिक आणि टॉपः 6 मीटर लांब साडीपासून तुम्ही आरामात ट्युनिक किंवा टॉप बनवू शकता. जर तुमच्याकडे बांधनी, ब्लॉक प्रिंट किंवा बाटिक साडी असल्यास त्यापासून तुम्ही खूप सुंदर टॉप किंवा शॉर्ट कुर्ती शिवून घेऊ शकता. या कुर्ती तुम्ही जिन्सवर परिधान करु शकता.
पोटली बॅगः जुन्या साड्यापासून तुम्ही सुंदर पोटली बॅगदेखील बनवू शकता. जर तुमच्याकडे एखादी हेवी साडी असेल तर आरामात तुम्ही त्यापासून पोटली बॅग बनवू शकता. जे तुम्ही फेस्टिव्ह सिझनमध्ये आरामात परिधान करु शकता.
तुमच्याकडे असलेल्या दोन साड्या मधोमध कापून घ्या. या दोन्ही साड्यांचा वापर करुन एक कॉन्ट्रास्ट दुपट्टा शिवू शकता