दीपाली जगताप-पाटील, झी मीडिया, मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत अद्यापही शिक्षण विभागाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मुंबईतील जय हिंद महाविद्यालयात या प्रकरणी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक पार पडली. नवनिर्वाचित शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलारही या बैठकीला उपस्थित होते. नामांकित महाविद्यालयांच्या प्रवेशाच्या जागा वाढवण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं आहे. मात्र राज्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली असून सीबीएसईची लेखी गुण ग्राह्य धरण्याबाबत शिक्षण विभागाने अंतिम निर्णय घेतलेला नाही.
८ जूनला दहावीचा राज्य शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर झालाय. नऊ दिवस उलटले तरी शिक्षण विभागाला तोडगा काढण्यात यश आलेलं नाही. राज्यातील २३ लाखांहून अधिक विद्यार्थी अकरावी प्रवेशाची वाट पाहत असून शैक्षणिक वर्ष सुरू होण्यासही अधिक विलंब होणार आहे.