नागपूर मनपाकडून १२० टँकरची सेवा बंद

१० कोटींची बचत होणार, नगरसेवकांचा मात्र विरोध

Updated: Feb 29, 2020, 11:32 AM IST
नागपूर मनपाकडून १२० टँकरची सेवा बंद title=
फाईल फोटो

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर महापालिका प्रशासनाने अनेक वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा करणारे १२० टँकर तडकाफडकीने बंद करण्याचा निर्णयावरून मोठा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. नगरसेवकांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर प्रशासनाने टँकरची गरज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. 

नागपूरमधील नरसाळा आणि हुडकेश्वर परिसर पाणीपुरवठा करणा-या अनेक टँकरची वर्दळ इथं असायची मात्र, आता येथे काही मोजकेच टँकर आले आहेत. महापालिका प्रशासनाने १२० टँकरची सेवा तडकाफडकीने बंद केल्यानं असं चित्र दिसत आहे. तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या एका महिन्यात पालिका कारभाराला शिस्त लावतानाच अनेक खर्चांवर कात्री लावली आहे. 

नागपूर शहराच्या बाहेरील भागातील वस्त्यांमध्ये ३४६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जायचा. या टँकर्सवर दरवर्षी २८ कोटी रुपये खर्च होतो. १२० टँकर्स बंद करण्यात आल्याने आता दरवर्षी सुमारे १० ते ११ कोटींची बचत होणार आहे. अनेक वस्त्यांमध्ये नळ योजना सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे टँकरची गरज उरलेली नाही, असा प्रशासनाचा दावा आहे. 

स्थानिक नगरसेवकांनी पालिका प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र विरोध सुरु केला आहे. येणाऱ्या काही दिवसात पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला आंदोलन करावी लागतील असा इशारा नगरसेवकांनी दिला आहे. टँकर चालकांनीही तुकाराम मुंढे यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. 

टँकरून भाजपा आणि आयुक्त मुंढे यांच्यात यंदाच्या उन्हाळ्यात चांगलाच वाद पेटणार असल्याची चिन्ह आहेत. 

दरम्यान, नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी कडकशिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने बदली केली. मुंढे आधी मुंबईत एडस् नियंत्रण सोसायटीच्या संचालकपदी होते. तिथून त्यांची बदली नागपूर महापालिकेत करण्यात आली.