सातारा : गेल्या दोन वर्षात मोक्का कायद्यांतर्गंत सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी धडाका लावलाय. 13 टोळीतील तब्बल 102 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून मोक्का कारवाईची सेंच्युरी पूर्ण केली.
दरम्यान, सातारा जिल्ह्याचा कार्यभार हाती घेतल्यानंतर तडीपारीत 100 हून अधिक व मोक्कासारख्या प्रकरणातही 100 हून अधिक गुन्हेगारांवर कारवाई केल्याने पोलिस दलाच्या इतिहासात रेकॉर्डब्रेक कारवाई झाली आहे.
सातारा शहर व जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठवत जिल्हा पोलीसप्रमुख संदीप पाटील यांनी ‘मोके’ पे चौका लगावणारी कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे सातार्यातील गुन्हेगारी विश्वाचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.
सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना रहावी यासाठी एसपी संदीप पाटील हे पहिल्यापासूनच आग्रही राहिले आहेत.
जिल्हा पोलीस दलाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार, गुंड, बेकायदा सावकारी करणारे, जबरी चोरी करणारे, घरफोडी बहाद्दर, समाजात भिती व दहशत निर्माण करणारे यांच्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना त्यांनी केल्या होत्या. पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी प्रत्येक गुंडा-पुंडाची कुंडली तयार केल्यानंतर सुरुवातीला त्यानुसार तडीपारीचा धडाका लावण्यात आला.
तडीपारीबरोबरच ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत हळूहळू त्या त्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचाही सपाटा लावण्यात आला. दहशत माजवून बेकायदेशीर मार्गाने आर्थिक फायदा करणारे व खासगी सावकारी करणार्या 13 टोळ्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमान्वये (मोक्का) प्रस्ताव तयार करुन तो कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला होता. सातार्यातून 13 टोळ्यांविरुध्द मोक्काचे प्रस्ताव पाठवल्यानंतर त्या सर्व प्रस्तावांना अखेर मंजुरी मिळाली आहे.