मुंबई : महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे.
एक महिना ९ महिने नव्हे तर तब्बल १५ महिने गरोदर होती. आणि तिला याबाबत कोणतीही माहिती नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे हे भ्रृण महिलेच्या गर्भाशयात नव्हे तर पोटात होता. १५ वर्षे शरीरात राहिल्याने भ्रृणाचे शरीर कठिण झाले होते.
वैद्यकीय परिभाषेत याला ‘स्टोन बेबी’ असे संबोधण्यात येते. शहरातील ‘लॅप्रोस्कोपिक सर्जन’ डॉ.नीलेश जुननकर यांच्या प्रयत्नांमुळे संबंधित महिलेला १५ वर्षांच्या यातनेपासून मुक्तता मिळाली. जयश्री तायडे यांना गेल्या १५ वर्षांपासून पोटदुखीची समस्या होती. ‘अॅसिडिटी’मुळे असे होत असेल असे त्यांना वाटायचे. मात्र काही दिवसांपासून त्यांना पोट दुखीचा त्रास होऊ लागला आणि उलट्या देखील होऊ लागल्या. त्यानंतर त्या श्रद्धानंदपेठ येथील डॉ.नीलेश जुननकर यांच्याकडे तपासणीसाठी गेल्या. डॉ. जुननकर यांनी रुग्णाचे सिटी स्कॅन केले असता आतड्यांमध्ये ‘स्टोन’सदृश गोष्टीमुळे अडथळा निर्माण झाल्याने दिसून आले.
यानंतर डॉक्टरांनी लॅप्रोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. कारण ती ‘स्टोन’सदृश गोष्ट ही चक्क चार महिन्यांचा मृत भ्रूण होता. गर्भधारणेचे वय नसताना रुग्णाच्या पोटात हा गर्भ कुठून आला ही बाब धक्कादायक होती. शस्त्रक्रिया केल्यानंतर भ्रृण आणि वाढलेले आतडे काढण्यात आले.
१९९९ साली जयश्री तायडे यांचे लग्न झाले. २००० साली त्यांनी पहिल्या मुलीला जन्म दिला. दोन वर्षांनी त्या पुन्हा गर्भवती राहिल्या. मात्र काही कारणांमुळे त्या गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांकडे गेल्या. त्यांना वाटले पूर्णपणे गर्भपात झाले मात्र प्रत्यक्षात तो गर्भ त्या प्रक्रियेदरम्यान गर्भातून पोटात गेला. ही गोष्ट कुणाच्याही लक्षात आली नाही. ४ ते ५ महिने तो गर्भ वाढला. मात्र त्यानंतर गर्भाशयासारखे पोषक वातावरण न मिळाल्यामुळे तो मृत झाला. वर्षागणिक तो भ्रूण ‘कॅल्सिफाय’ झाला व दगडासारखा टणक झाला. मात्र यामुळे आतड्यांना इजा पोहोचत गेली, असे डॉक्टरांनी सांगितले.