कोल्हापुरात खळबळ! 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून

Kolhapur Crime News: कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कोल्हापुरच्या कारागृहात खून झाल्याचे समोर आले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 2, 2024, 01:55 PM IST
कोल्हापुरात खळबळ! 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून title=
1993 mumbai bomb blast accused killed in Kolhapur jail

प्रताप नाईक, झी मीडिया

Kolhapur Crime News: कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याचा खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत ही खुनाची घटना घडली असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे मयत कैदी हा 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचे समोर येत आहे. या घटनेने पुन्हा एकदा कारागृहातील बेशिस्त पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. जुना राजवाडा पोलिसांकडून कारागृहात खुनाच्या घटनेचा पंचनामा सुरू करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता (वय 70) हा कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हौदावर तो अंघोळ करण्यासाठी गेला होता. तिथे न्यायालयीन बंदी आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत,  संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार , सौरभ विकास सिद्ध या पाचजणांसोबत त्याचा वाद झाला होता. 

आरोपींसोबत झालेल्या वादानंतर या पाच आरोपींनी ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाने मारहाण कैद्याला मारहाण केली. ड्रेनेजवरील लोखंडी झाकनाने हल्ला केल्याने मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान याच्या वर्मी धाव बसला होता त्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  कैद्याच्या दोन गटात झालेल्या हाणामारीमुळं या कैद्याचा खून झाला आहे. मात्र, हा प्रकार होत असताना जेल अधीक्षक कुठे होते, त्यांना हा प्रकार लक्षात आला नाही का?, असे सवाल उपस्थित होत आहेत. 

समोर आलेल्या माहितीनुसार, कळंबा कारागृहात वारंवार दोन टोळींमध्ये शीतयुद्ध होत असते. कारागृहात वर्चस्व राहावं त्यामुळं वारंवार अशाप्रकारच्या हाणामारी होत असतात. 1993 सालच्या बॉम्बस्फोटातील आरोपी आंघोळीसाठी हौदावर गेला असताना त्याला पाच जणांच्या टोळीने त्याच्या डोक्यावर झाकण मारुन त्याचा खून केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अशा घटना कारागृहात घडत आहेत. मात्र, त्याकडे कारागृहाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. सध्या जुना राजवाडा पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.