धक्कादायक....नागपुरात काही तासांत २ कोरोनाग्रस्तांची आत्महत्या

नागपुरात काही तासांमध्ये २ कोरोनाग्रस्तांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही रुग्ण हे वृद्ध असून त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. 

Updated: Mar 30, 2021, 02:43 PM IST
धक्कादायक....नागपुरात काही तासांत २ कोरोनाग्रस्तांची आत्महत्या

मुंबई : नागपुरात काही तासांमध्ये २ कोरोनाग्रस्तांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही रुग्ण हे वृद्ध असून त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. 

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात कोविड वॉर्डच्या बाथरूममध्ये एका कोरोनाग्रस्त रुग्णाने काल संध्याकाळी गळफास घेतला. या रुग्णाचे वय ८१ वर्षे होते. २६ मार्चला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. 

काल संध्याकाळच्या सुमारास रुग्ण बाथरूमला गेलेला, पण बराच वेळ झाला, तरी रुग्ण बाहेर न आल्याने सफाई कर्मचाऱ्याला शंका आली आणि त्याने ही गोष्ट डॉक्टरांच्या कानावर टाकली. त्यानंतर या वृद्ध कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याचे समोर आले. 

तर दुसरी घटनाही नागपुरातील अजनी पोलिस स्टेशन परिसरात घडली आहे. या रुग्णाने आपल्या राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केली. या वृद्धाचे वय ६८ वर्ष होते. दुसऱ्या घटनेतील रुग्णाची कोरोना चाचणी २६ मार्चला पॉझिटिव्ह आलेली. 

या रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजतंय. दुसऱ्या घटनेतील रुग्णाने आजारपणाच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.