डोंबिवलीत इमारतींना तडे गेल्यामुळे खळबळ, रहिवासी राहतं घर सोडून रस्त्यावर, नेमकं काय चाललंय?

डोंबिवलीतील (Dombivli) लोढा हेवन परिसरात असलेल्या शांती उपवन इमारतीला तडे गेल्याने खळबळ उडाली आहे. या सोसायटीमधील एकूण पाच इमारतींमध्ये राहणारी 240 कुटुंबं रस्त्यावर आली आहेत. प्रशासनाने आपली योग्य सोय करावी अशी मागणी या रहिवाशांकडून केली जात आहे.   

Updated: Mar 5, 2023, 03:28 PM IST
डोंबिवलीत इमारतींना तडे गेल्यामुळे खळबळ, रहिवासी राहतं घर सोडून रस्त्यावर, नेमकं काय चाललंय? title=

डोंबिवलीत (Dombivli) इमारतींना तडे गेल्याने तात्काळ त्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. लोढा हेवन परिसरात असलेल्या शांती उपवन या इमारतीला तडे गेल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर एकूण पाच इमारतींमध्ये राहणाऱ्या 240 कुटुंबांना घऱाबाहेर काढण्यात आलं असून, ते रस्त्यावर आले आहेत. प्रशासनाने आपली योग्य सोय करावी अशी मागणी या रहिवाशांकडून केली जात आहे. 

सोसायटीमधील 'एफ' विंग इमारतीत दुरुस्तीचं काम सुरू होतं. त्यावेळेस नागरिकांना इमारतीला तडे गेले असल्याचं लक्षात आलं. सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ या सोसायटीमधील पाच इमारतींमधील रहिवाशांना घऱं खाली करण्यास सांगण्यात आलं. या पाच इमारतींमध्ये एकूण २४० कुटुंब वास्तव्यास आहेत. 

अचानक डोक्यावरील छत गायब झाल्याने ही कुटुंबं रात्रभरापासून एकाच कपड्यावर घऱाबाहेर आहेत. महापालिका, पोलीस प्रशासनाकडून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र सगळं साहित्य घरातच असल्याने नेमकं काय करावं हे रहिवाशांना कळत नाही आहे. अनेक विद्यार्थ्यांची दहावी आणि बारावीच्या परीक्षा असून त्यांचे हॉल तिकीट देखील घरामध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर अभ्यास कुठे करायचा आणि परीक्षा कशी द्यायची असा मोठा प्रश्न आहे. 

रात्रभरापासून ही कुटुंबं रस्त्यावर असून त्यांनी घरातील साहित्य काढून द्यावे अशी विनंती प्रशासनाला केली होती. त्यानुसार प्रशासनाने धोकादायक झालेली 'एफ विंग वगळता इतर इमारतीमधील रहिवाशांना अती महत्त्वाच्या वस्तू बाहेर काढण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार रहिवाशी आपल्या घरात जाऊन अती महत्त्वाच्या वस्तू घेऊन आपल्या नातेवाईकांकडे आसरा घेताना दिसत आहेत. मात्र प्रशासनाने आमची योग्य सोय करावी अशी विनवणी या बेघर झालेल्या रहिवाशांकडून केली जात आहे.