बदलापूर हादरले! नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार

Badlapur Crime News: बदलापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील व्यक्तीने विद्यार्थ्यांवर अत्याचार केला आहे

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 17, 2024, 10:34 AM IST
बदलापूर हादरले! नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार  title=
3 5 year-old student raped by man in school in badlapur

Badlapur Crime News: कोलकत्ता येथे ट्रेनी डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार ताजा असतानाच आता बदलापूर येथूनही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदलापूरातील नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शाळेतीलच अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

बदलापूरातील एका नामांकित शाळेत तीन ते साडेतीन वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर बदलापूर शहर हादरलं असून संतापजनक बाब म्हणजे बदलापूर पोलिसांनी इतक्या संवेदनशील प्रकरणात तब्बल 12 तासांनंतर गुन्हा दाखल करुन घेतला आहे. 

पीडित कुटूंबाला मध्यरात्रीपर्यंत गुन्हा दाखल होण्यासाठी वाट पाहावी लागली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटूंबासोबत पोलिस ठाण्यात येत पोलिसांना याची माहिती देत हा प्रकार समोर आणला होता. त्यानंतर महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी पीडित कुटूंबासोबत मध्यरात्रीपर्यंत थांबल्यावर पोलिसांना शाळेतील अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील हा नराधम पीडितांचे शोषण करत होता. त्यातील एका पिडीत मुलीने घरच्यांना याची माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. मात्र इतक्या संवेदनशील घटनेबाबत पोलिसांनी दाखवलेल्या बेजबाबदार आणि हलगर्जीपणामुळे पोलिसांवर टीका होत आहे. या प्रकरणात पोलिस अधिक माहिती घेत आहेत. 

नालासोपाऱ्यात विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार 

नालासोपारा येथील शाळेत १४ वर्षीय विद्यार्थीनीवर एका शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेने पालक वर्गातून तीव्र पडसाद उमटले आहेत. आरोपी हा गेल्या सहा महिन्यांपासून पीडित तरुणीला धमकावून शाळा व क्लासेस मध्ये लैंगिक अत्याचार करत होता. हा प्रकार पीडित तरुणीने पालकांना सांगितल्यानंतर उजेडात आला, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.