3 Crore Stolen At Karad: तुम्ही आतापर्यंत चित्रपटांमध्ये एखाद्या कारमधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम चोरल्याचे सीन पाहिले असती. मात्र असा घटनाक्रम महाराष्ट्रातील कराडमध्ये घडला आहे. कराडमधून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरु महामार्गावर ही फिल्मी स्टाइल चोरीची घटना घडली असून या घटनेत तब्बल 3 कोटी रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी पळवली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई- बंगळुरु महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कारवर चोरट्यांनी हल्ला करुन मुद्देमाल पवळवला. ही कार अडवून सहा आरोपींनी गाडीतील तीन कोटी रूपयांची रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही लुटमार करणाऱ्या सहा आरोपीं रिव्हॉलव्हर आणि धारदार शस्त्र होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या तपशीलानुसार, मंगळवाररी पहाटे पाच वाजता ही घटना घडली. भरधाव कारला रोखण्यासाठी फिल्मी स्टाइलमध्ये तिच्यासमोर चोरट्यांनी कार आडवी लावत गाडी थांबवली. सदर कार मुंबई ते बेंगलोर असा प्रवास करत असताना तिला सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये रोखण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
कराडमधून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरु महामार्गावरील ढेबेवाडी फाट्याजवळ ही कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम घेऊन जाणारी कार आली असताना चोरट्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये आपल्या कारने ओव्हटेक करत या कारसमोर आडवी लावली आणि तिला थांबण्यास भाग पाडलं. पैसे घेऊन जाणाऱ्या कारमधील चालकाला काहीही समजण्याआधीच या आडवल्या लावलेल्या कारमधून आरोपी खाली उतरले आणि त्यांनी आपल्याकडील शस्त्रांच्या मदतीने चालकाला भीती दाखवली. चोरट्यांच्या कारमधून बाहेर आलेल्या व्यक्तींपैकी तिघांकडे रिव्हॉलव्हर होते तर उर्वरीत तिघांकडे धारदार शस्त्र होती, अशी माहिती चालकाने दिली आहे. जीवाच्या भितीने चालकाने कोणतीही प्रतिकार केला नाही. या आरोपींनी कारमधील तीन कोटी रुपयांची रोख रक्कम काढून ताब्यात घेतली. त्यानंतर हे दरोडेखोर मुंबईच्या दिशेने पळून गेले.
प्राथमिक तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, ही रक्कम हवालाची असल्याचे समोर आले आहे. या घटनेची नोंद कराड शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून संशयीत म्हणून पोलिसांनी कराड शहर परिसरातील चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या कारमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे आहेत हे फक्त संबंधित हवाला कंपनीतील अधिकाऱ्यांनाच माहिती होते. त्यामुळेच कराड पोलिसांनी आता अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.