Maharashtra Weather News : जुलै आणि सप्टेंबर महिन्यात थैमान घातल्यानंतर आता अखेर यंदाच्या वर्षीचा मोसमी पाऊस महाराष्ट्रातील मुक्काम संपवून पुढच्या प्रवासासाठी निघाला आहे. सध्याच्या घडीला देशातून, प्रामुख्यानं महाराष्ट्रातून नैऋत्य मान्सूननं परतीची वाट धरलेली असतानाच राज्यात पावसासाठी मात्र पूरक वातावरण निर्मिती होताना दिसत आहे. पण, हा मान्सून नाही हेसुद्धा तितकंच खरं.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून पतला असूनही राज्याच्या कोकण पट्ट्यासह मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातही पावसाच्या जोरदार सरींची शक्यता तुरळक भागांमध्ये वर्तवण्यात आली आहे. मोसमी पाऊस देशातून परतला असतानाच आता दक्षिण भारतात ईशान्य मोसमी पाऊस सक्रीय झाला आहे. ज्याचे परिणाम महाराष्ट्रापर्यंत दिसून येत आहेत.
यंदाच्या वर्षी एक ते दोन दिवस आधील दाखल झालेल्या पावसानं अपेक्षित काळात माघार घेतली. गुजरातच्या कच्छपासून सुरी झालेला हा प्रवास पुढं हरियाणा, दिल्ली, लेह, लडाख, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेशातून माघारी निघाला होता. मागोमागच पावसानं महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरु केला.
एकिकडे महाराष्ट्रातून पावसानं माघार घेतल्यामुळं तापमानात काही अंशांची वाढ झाली असून, दिवस मावळतीला जाताना मात्र सोसाट्याचे वारे आणि आकाशात येणाऱ्या छटा वातावरणाचं वेगळं आणि काहीसं अनपेक्षित रुप सर्वांपुढे आणत आहेत.
पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवांमानाची स्थिती पाहता ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर इथं विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.