राज्यात ५० ठिकाणी सुरु होणार १० रुपयात शिवभोजन केंद्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेत घोषणा

Updated: Dec 21, 2019, 05:45 PM IST
राज्यात ५० ठिकाणी सुरु होणार १० रुपयात शिवभोजन केंद्र title=

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज १० रुपयात शिवभोजन घोषणा केली. हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यात शिवसेनेने याची घोषणा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी १० रुपयात जेवण देण्यासाठी केंद्र सुरु करणार असल्याची घोषणा आज विधानसभेत केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मरण करत आमच्या सरकारने असं ठरवलं आहे की गोरगरिबांना १० रुपयांमध्ये शिवभोजन देण्याची योजना आम्ही सुरू करत आहोत. सुरुवातीला राज्यात ५० ठिकाणी ही केंद्र सुरु करण्यात येणार आहे. याचा अनुभव घेतल्यानंतर संपूर्ण राज्यभर कसा त्याचा विस्तार करु. वचननाम्यातील आमचं एक वचन असलेलं १० रुपयात जेवण हे आम्ही सुरु करत आहोत. लवकरात लवकर त्याचं उद्घाटन होईल. या उद्घाटनला आपण सर्वांनी यावं असं आमंत्रण मी सर्वांना देत आहे. असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

शिवसेनेने आश्वासन दिलेल्या 10 रुपयात थाळीची सुरवात याआधी पालिका मुख्यालयातून करण्यात आली. पालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी ही 10 रुपयात थाळी सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर आज राज्यातील गोरगरिबांना देखील याची घोषणा करण्यात आली.