सहा पुरुषांशी केलं लग्न, पैसे आणि दागिने घेऊन फरार; सातव्या प्रयत्नात मात्र फसली; मोडस ऑपरेंडी ऐकून पोलीसही चक्रावले

बांदा येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिव राज यांनी सांगितले की, आरोपी लग्नाच्या नावाखाली लोकांना फसवत असल्याची तक्रार त्यांना मिळाली होती.  

शिवराज यादव | Updated: Dec 25, 2024, 06:15 PM IST
सहा पुरुषांशी केलं लग्न, पैसे आणि दागिने घेऊन फरार; सातव्या प्रयत्नात मात्र फसली; मोडस ऑपरेंडी ऐकून पोलीसही चक्रावले title=

उत्तर प्रदेशात अविवाहित पुरुषांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरण्याचं रॅकेट चालवलं जात होतं. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील बांदा येथे दोन महिला आणि दोन पुरुषांना अटक करण्यात आली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम नावाची तरुणी नवरीमुलगी म्हणून उभी राहत असे आणि संजना गुप्ता नावाची महिला तिची आई असल्याचं नाटक करायची. विमलेश वर्मा आणि धर्मेंद्र प्रजापती हे ज्यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं अशा अविवाहित पुरुषांचा शोध घ्यायचे आणि त्यांची पूनमशी भेट घडवून आणायचे. 

कथित आरोपानुसार, आरोपी टार्गेटला नातं जुळवण्यासाठी पीडितांना आधी पैसे देण्यास सांगत असत. यानंतर साध्या पद्धतीने कोर्टात लग्न केलं जात असे. पूनम लग्नानंतर नवऱ्यामुलाच्या घरी जायची. तिथे संधी मिळताच ती घरातून दागिने आणि पैसे घेऊन पळ काढत असे. 

पोलिसांनी सांगितलं आहे की, आरोपींनी आतापर्यंत 6 जणांना अशाप्रकारे गंडा घातला होता. सातव्यांदा त्यांनी शंकर उपाध्याय नावाच्या तरुणाला आपल्या जाळ्यात ओढलं होतं. त्याने पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार केली. तक्रारदाराने सांगितलं की, तो अविवाहित होता आणि लग्नासाठी मुलीच्या शोधात होता. विमलेश त्याला भेटला आणि आपल्याला 1.5 लाख दिले तर लग्न लावून देतो अशी बतावणी केली. यावर शंकर उपाध्याय तयार झाला होता. 

शनिवारी विमलेशने त्याला कोर्टात बोलावलं आणि पूनमशी ओळख करुन दिली. यानंतर त्यांनी शंकरकडे 1.5 लाख रुपये मागितले. शंकर उपाध्यायला संशय आल्याने त्याने पूनम आणि तिची आई म्हणून ओळख करुन दिलेल्या संजना यांचे आधार कार्ड मागितले. 

"त्यांच्या वागण्यावरुन ते माझी फसवणूक करणार असल्याची शंका मला आली. जेव्हा मी नाकर दिला तेव्हा त्यांना मला मारुन टाकण्याची आणि खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. मी त्यांना मला विचार करण्यासाठी वेळ हवा असल्याचं सागितलं," अशी माहिती शंकर उपाध्यायने पोलीस तक्रारीत दिली आहे. 

बांदा येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिव राज यांनी सांगितले की, आरोपी लग्नाच्या नावाखाली लोकांना फसवत असल्याची तक्रार त्यांना मिळाली होती. "आम्ही आमच्या टीमला ताबडतोब सतर्क केले आणि दोन महिलांसह चार जणांना अटक केली. हे लोक अविवाहित पुरुषांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करतील आणि नंतर दागिने आणि रोकड चोरायचे. आम्ही त्यांना अटक केली आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे."