नगर-कल्याण महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, सहा जण जागीच ठार

Ahmednagar Kalyan Highway Accident: अहमदनगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 24, 2024, 12:34 PM IST
नगर-कल्याण महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, सहा जण जागीच ठार  title=
6 people killed in accident on Ahmednagar Kalyan highway

Accident News in Marathi: अहमदनगर-कल्याण महामार्गावर भीषण (Ahmednagar Kalyan Highway Accident)अपघात झाला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला असून यात 6 जण ठार झाले आहेत. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरट्रक्टर व ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांचा ढवळपुरी फाटयाजवळ पहाटे 2.30च्या दरम्यान भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

बुधवार दिनांक 24 जानेवारी रोजी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळं काही वेळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तर, मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण-निर्मल महामार्गावर उस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ठाणे मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांच्यात ढवळपुरी फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की तिन्ही वाहनांचा चक्काचुर झाला आहे. या वाहनांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. यात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयामधे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. डिवायएसपी संपतराव भोसले, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पारनेरचे सहायक पोलीस निरिक्षक प्रमोद वाघ यांनी टिमसह घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्ताना तातडीने मदत केली आहे. अपघातग्रस्त वाहने बाजुला केली असून सध्या वाहतूक सुरळीत झाली आहे. दरम्यान अपघातग्रस्तांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत.

बदलापूरात रिंग रोडवर स्टंटबाजी करताना अपघात

बदलापूर पूर्वेच्या रिंग रोडवर स्टंटबाजी करताना एका कारचालकाचा अपघात झाला आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. या रोडवर मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि कारचालकांकडून स्टंटबाजी केली जाते. असाच प्रकार या रोडवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका कारचालकाकडून स्टंटबाजी करून केला जात होता. तेव्हा हा अपघात घडला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी या चालकाला पकडून ठेवले होते. रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात इमारती असल्याने नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असते. त्यामुळे अशा प्रकारच्या स्टंटबाजांना जर आवर घातला नाही तर एक मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी देखील याची दाखल घेऊन हे जीवघेणे स्टंट बंद करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक करत आहेत.