पोषण आहाराच्या पाकिटात सापडला मेलेला उंदीर; जळगावमधील धक्कादायक प्रकार

जळगावच्या नशिराबादेत अंगणवाडीत पोषण आहाराच्या पाकिटात मेलेला उंदीर सापडला आहे. चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ का? असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे.  

वनिता कांबळे | Updated: Jul 23, 2024, 08:34 PM IST
पोषण आहाराच्या पाकिटात सापडला मेलेला उंदीर; जळगावमधील धक्कादायक प्रकार title=

Jalgaon Mouse Founde In Anganwadi Poshan Aahar :आहाराच्या नावाखाली मुलांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं समोर आल आहे. जळगावात पोषण आहारात मेलेला उंदीर आढळला आहे. या आधीही अशा अनेक घटना घडल्यात.  सांगलीत पोषण आहारात साप आढळून आला होता. नागपुरात शालेय पोषण आहारात मेलेली चिमणी आढळल्याची धक्कादायक घटना घडली.

नागपूरच्या पारशिवानी तालुक्यातील घाटरोहणा ग्रामपंचायतीमध्ये ही घटना घडली होती. तर पुण्यातही अशाच एका घटनेनं खळबळ उडाली. शालेय पोषण आहारासाठी लागणा-या धान्याला कीड लागल्याचं समोर आलं. तांदुळ, मटकीसह मुगडाळीत किडे आणि अळ्या आढळल्या. खेड तालुक्यातल्या बहुळमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला होता.. तर पंढरपूरच्या कासेगावातील भुसेनगर मध्ये मुलांच्या पोषण आहारामध्ये चक्क मेलेला बेडूक आढळून आला होता..  विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून पोषण आहाराचा उपक्रम सुरू करण्यात आलाय. मात्र, यासाठी लागणारं धान्य निकृष्ट दर्जाचं असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होतायत. 

जळगावात अंगणवाडीतील पोषण आहारात चक्क मेलेला उंदीर सापडलाय.. जळगावच्या नशिराबाद इथं ही घटना घडलीये.. अंगणवाडीतील पोषण आहाराच्या मिक्स तांदळाच्या पाकिटात मेलेल्या उंदराचं पिल्लू सापडलंय.. तेजस्वी देवरे या गृहिणीच्या स्वयंपाकादरम्यान ही बाब लक्षत आली.. लहान मुलांच्या पोषण आहारात मेलेला उंदीर सापडल्यानं प्रशासनाचा अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय. 

सिलबंद पाकिटात चक्क मेलेलं वटवाघळाचं पिल्लू 

सरकारच्या पोषण आहार योजनेंतर्गत मिळणाऱ्या मसूरडाळीच्या सिलबंद पाकिटात चक्क मेलेलं वटवाघळाचं पिल्लू आढळून आलंय... गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा तालुक्यात बीजेपार गावामध्ये हा प्रकार घडलाय. गावातल्या मायरा वाघमारे या मुलीला अंगणवाडीतून हे पाकिट देण्यात आलं होतं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सचिन वाघमारेंनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर अन्न आणि सुरक्षा विभागानं अंगवाडीतील डाळ आणि अन्य साहित्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. तसंच कंत्राटदारांकडेही याबाबत विचारणा करण्यात आलीये.