सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : कोरोना महामारानीनंतर राज्यात प्रथमच घोडेबाजार भरला आहे. पंढरपूर मधील अकलूज येथील घोडे बाजारात( horse market of Pandharpur) जातिवंत अश्व दाखल झाले आहेत. या बाजारात बघताचक्षणी डोळ्यात भरला तो भारत पाकिस्तान बॉर्डरवरचा सलमान. घोडे बाजारात सलमानची किंमत तब्बल 51 लाख इतकी आहे.
पंजाब, राजस्थान, दिल्ली, बिहार, युपी राज्यातून घोडे व्यापारी आपले जातिवंत घोडे घेऊन अकलूजच्या बाजारात दाखल झाले आहेत. मात्र, यामध्ये आकर्षण ठरतोय तो मारवाड आणि पंजाब जातीचा सलमान अश्व.
सलमानचे वय साधारण दोन वर्ष आहे. याची किंमत 51 लाख रुपये इतकी आहे. सलमानचा वर्ण पांढरा शुभ्र असा आहे. त्याची उंची देखील नजरेत भरेल अशी आहे. डोळ्यात काजळ असल्यामुळे समानचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.
सलमानचा खुराक देखील अत्यंत राजेशाही असा आहे. सलमानला रोज पाच लिटर दूध दिले जाते. तसेच त्याला वेगवेगळ्या प्रकारचा पौष्टीत आहार दिला जातो.
पंजाब, मारवाड, काठेवाडी, सिंध अशा विविध प्रजातींचे तब्बल दीड हजार घोडे या घोडे बाजारात दाखल झाले आहेत. दिवाळी पाडव्याला सुरू झालेल्या या बाजारात सध्या 4 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. अजून महिनाभर हा बाजार चालणार आहे.