Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok chavhan) यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी सक्रीय राजकारणात दिसत आहे. काँग्रेसच्या भारत जोडो अभियानात( Bharat Jodo Yatra) श्रीजया अशोक चव्हाण (Srijaya Ashok Chavan) या सहभागी झाल्यात. आधी श्रीजया यांचे नांदेडमध्ये बॅरन झळकले होते. काँग्रेसच्या भारत जोडो अभियानाबाबत बॅनवरवर श्रीजया झळकल्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात पोहोचली आहे. पुढचे 14 दिवस यात्रेचा मुक्काम राज्यात असणार आहे. सध्या नांदेडमध्ये असलेल्या या यात्रेत चव्हाण कुटुंबीयांची तिसरी पिढी सहभागी झालेचे दिसून आले. श्रीजया अशोक चव्हाण या मुलीने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. राहुल गांधी यांच्यासोबत त्या अग्रस्थानी होत्या.
श्रीजया चव्हाण या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची मुलगी आहे. अद्याप त्या राजकारणापासून दूर होत्या. मात्र भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने त्यांचे राजकारणात लाँचिंग झाल्याचे दिसत आहे. भारत जोडो यात्रेच्या पोस्टर्समध्ये श्रीजया चव्हाण यांचा फोटो दिसला होता. त्यानंतर आता त्या राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेमध्ये दिसल्या.
राहुल गांधी यांनी हजारो मैल पायी प्रवास केला आहे. भारत जोडो यात्रेत हातात मशाली घेत हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. राहुल गांधी यांचे राज्यात फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले. आता आज ही यात्रा आणखी पुढे सरकली आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची भारत जोडो यात्रा राज्यात दाखल झाल्यानंतर राहुल यांनी काल नांदेड जिल्ह्यात पोहोचले. येथे गुरू नानक जयंतीनिमित्त रात्रभर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी शिखांच्या पारंपरिक वेषात दिसले.
राहुल गांधी यांच्या 'नफरत छोडो भारत जोडो'चा संदेश देणारी ही पदयात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात सोमवारी रात्री दाखल झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काँग्रेस पक्षाच्या निशाणीसह फडकणारे तिरंगी झेंडे, तिरंगी पताका आणि तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई, असे देगलूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वातावरण तिरंगामय झाले होते. लहान मुले, महिला, तरुण आणि वयोवृद्ध नागरिकांनी रस्त्याच्या बाजूला प्रचंड गर्दी झाली होती. पदयात्रेच्या मार्गावर उत्साह ओसंडून वाहत होता.