पुणे: 'माझ्या गाडीला धक्का लागतोय', म्हणणाऱ्या तरुणाला टोळक्याने दगडाने ठेचून मारलं; भाच्यासमोर मामाची हत्या

पुण्यात कारचा धक्का लागल्याने क्षुल्लक वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.  याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

शिवराज यादव | Updated: Dec 14, 2023, 12:00 PM IST
पुणे: 'माझ्या गाडीला धक्का लागतोय', म्हणणाऱ्या तरुणाला टोळक्याने दगडाने ठेचून मारलं; भाच्यासमोर मामाची हत्या title=

शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील गुन्हेगारी काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. हडपसर परिसरात फक्त कारचा धक्का लागला म्हणून एका 30 वर्षीय तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. 10 जणांच्या टोळक्याने कारचालकावर धारदार शस्त्राने वार करत, तसंच दगडाने ठेचून ठार केलं. शेवाळवाडी येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

अभिषेक संजय भोसले (वय 30, रा. शेवाळवाडी, मांजरी) असं खून झालेल्या कारचालकाचं नाव आहे. याप्रकरणी विलास सुरेश सकट, कैलास सुरेश सकट, सचिन सकट (सर्व रा. चंदवाडी, फुरसुंगी) यांच्यासह आणखी 7 ते 8 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिषेक याचा भाचा अथर्व दादासाहेब साबळे (वय १८, रा. ऑर्चिड रेसिडन्सी, शेवाळवाडी, मांजरी) याने फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितलं की, अभिषेक भोसले आपला भाचा अथर्वसह  कारमधून रात्री 10 च्या सुमारास बाहेर पडला होता. फुरसुंगी-चंदवाडी रस्त्यावरून ते जात असताना तिथे विलास सकट आणि कैलास सकट यांचं काही कारणावरुन भांडण सुरु होतं. यावेळी त्यांचा कारला धक्का लागला. यामुळे अभिषेकने तुमच्या भांडणात माझ्या गाडीचं नुकसान करु नका असं सांगितलं. यावरुन विलास सकट याने अभिषेकशी वाद घालण्यास सुरुवात केली. 

आरोपींसह त्यांच्या सर्व साथीदारांनी अभिषेक आणि अथर्वला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी धारदार शस्त्रं आणि दगडाने अभिषेकवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात अभिषेक गंभीर जखमी झाला. अर्थवने मध्यस्थी करत वाचवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यालाही मारहाण केली. यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. 

अभिषेकला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारापूर्वीच अभिषेकचा मृत्यू झाला. अभिषेकचा भाचा अथर्व याने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेत आहेत. 

Tags: