चंद्रपूर : अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या 'प्रहार संघटने'त फूट पडली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. प्रहार संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष यांनी आता वेगळी चूल मांडली आहे. त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा आसरा न घेता थेट नव्या पक्ष संघटनेची घोषणाच केली. त्यांनी आपल्या प्रस्तावित पक्षाच्या ध्वजाचे अनावरणही केले.
'प्रहार संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी संघटनेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आपली नवी संघटना स्थापन केलेय. 'जन विकास सेना' या नावाने संघटना स्थापन केली आहे. जिल्ह्यात प्रहार संघटनेत केंद्रीय नेतृत्वाकडून गुन्हेगारी व्यक्तींच्या लोकांना प्रोत्साहन दिले जात होते, असा आरोप करत काहींनी संघटनेचा त्याग केला. तसेच या आरोपावरून प्रहार जिल्हा कार्यकारिणीने राजीनामा दिला होता.
प्रहार जिल्हा कार्यकारीने राजीनामा दिल्यानंतर काहीही हालचाल झाली नाही. त्यानंतर जिल्ह्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले पप्पू देशमुख यांनी थेट आपली नवी संघटना काढण्याचा निर्णय घेतला आणि जन विकास सेनेची स्थापना केली. या संघटनेच्या ध्वजाचे देखील अनावरण करण्यात आले. पप्पू देशमुख चंद्रपूर महानगर पालिकेत प्रहार संघटनेचे नगरसेवक म्हणून निवडणून आलेले आहेत.