राज्यात महिनाभरात घडल्या 3 रुग्णालय दुर्घटना, 'इतके' रुग्ण दगावले

महिनाभरातील रुग्णालयातील दुर्घटनांमध्ये 53 रुग्ण दगावले

Updated: Apr 23, 2021, 11:04 AM IST
राज्यात महिनाभरात घडल्या 3 रुग्णालय दुर्घटना, 'इतके' रुग्ण दगावले title=

मुंबई : राज्यात एकिकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजन, बेड्स आणि औषधांचा तुटवडा जाणवतोय. अशा परिस्थिती दुसरीकडे कोविड रुग्णालयातील दुर्घटनांमुळे अनेकांना आपला प्राण गमावावा लागतोय.  

गेल्या महिन्याभरात सुमारे 53 रुग्णांना अशा दुर्घटनांमध्ये प्राण गमवावा लागलाय. 25 मार्चला भाडूंपच्या कोविड सेंटमध्ये आग लागली होती. या अपघातात 11 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. 

21 एप्रिलला नाशिक महापालिका रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाली. यावेळी व्हेंटिलेटरवर असलेल्या 29 रुग्णांचा बळी गेलाय. विरारमध्ये आज विजय वल्लभ कोविड सेंटरमध्ये आग लागलीय. यात 13 रुग्ण दगावले आहेत.

विरारच्या रुग्णालयात आगीचं तांडव 

विरारच्या विजयवल्लभ रुग्णालयात काल मध्यरात्रीच्या सुमारास आयसीयु वॉर्ड मध्ये भीषण आग लागली. या आगीत 13 जणांचा  होरपळून मृत्यू  झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये. 

या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने वसई विरार महापालिकेचं अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी पोहोचलं. 

सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून इतर रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आलंय. या संपूर्ण घटनेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आयसीयूमध्ये एकूण 17 जण होते.