Aadhaar Cards Misused Mumbai Crime: अनोळखी व्यक्तीच्या हातात आधारकार्ड (Aadhar Card) देताय तर ही बातमी लक्षपूर्वक वाचा. बोरीवलीतील एका दुकानातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये गुन्ह्यात वापरण्यात आलेली सिम कार्ड (Sim Card) बोरीवलीतून (Borivali) विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसंच, या प्रकरणी काही नागरिकांच्या आधार कार्डचा वापर करण्यात आल्याचीही माहिती समजतेय. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणी 8 जणांना अटक केली आहे. त्यातील एक आरोपी मोबाइलच्या दुकानात काम करत असल्याची माहिती आहे. एका टेलिकॉन कंपनीच्या नोडल अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. (Aadhar Card Misused To Sold Sim Card)
उत्तर प्रदेशातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केल्यानंतर जौनपुरमधील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी तपासादरम्यान बोगस कॉल सेंटरमध्ये वापरण्यात आलेली 128 सिमकार्ड ही मुंबईत विकल्याचे समोर आले होते. त्या 128 सिमकार्डपैकी 99 सिमकार्ड बोरीवलीतील आयसी कॉलनीतील एका मोबाईलच्या दुकानातून विकली गेल्याचे तपासादरम्यान उघड झाले.
बोरीवलीच्या दुकानातून विक्री करण्यात आलेले सिमकार्ड एका आघाडीच्या टेलिकॉम कंपनीच्या नावावर होते. त्यामुळं दूरसंचार निगमने या कंपनीच्या अधिकाऱ्याला याची माहिती दिली. तेव्हा त्याने पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2023 या दरम्यान आरोपींनी सिम कार्डची विक्री करण्यासाठी दुकानात आलेल्या ग्राहकांच्या आधार कार्ड आणि बायोमॅट्रिक्सचा वापर केला. आरोपींकडून खऱ्या ग्राहकांच्या कागपत्राचा गैरवापर करुन ते सिमकार्ड विकण्यात आले होते. ग्राहकांच्या नावाने सिमकार्ड अॅक्टिव्हेट केले त्यानंतर आरोपींनी ते उत्तर प्रदेशमध्ये विकले. त्यानंतर ते बोगस कॉल सेंटरमध्ये वापरण्यात आले होते. या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
शनिवारी पोलिसांनी 8 जणांविरोधात आयपीसी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गंत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी आम्ही एका व्यक्तीला अटक केली आहे. तो बोरीवलीतील मोबाईलच्या दुकानात काम करत होता. आम्ही इतर आरोपींची कसून चौकशी करत आहोत, असं एमएचबी पोलिस कॉलनी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सुधीर कुलडाळकर यांनी ही माहिती दिली आहे. शेरू चौहान असं या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.