गायींच्या तस्करीचा आरोप, मध्य प्रदेशमधल्या मॉब लिचिंगमध्ये महाराष्ट्रातल्या तरुणाचा मृत्यू

गायी कतलीसाठी नेल्या जात असल्याची खबर पसरली आणि घडली धक्कादायक घटना  

Updated: Aug 4, 2022, 07:06 PM IST
गायींच्या तस्करीचा आरोप, मध्य प्रदेशमधल्या मॉब लिचिंगमध्ये महाराष्ट्रातल्या तरुणाचा मृत्यू

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : गायींच्या तस्करीचा आरोप करत मध्यप्रदेशमध्ये जमावाने केलेल्या मारहाणीत महाराष्ट्रातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशमधल्या नर्मदापूर इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. यात महाराष्ट्रातल्या अमरावती इथल्या नझीर अहमद या तरुणाचा मृत्यू झाला.

नेमकी घटना काय?
मध्यप्रदेशमधून गायींनी भरलेला एक ट्रक महाराष्ट्राच्या दिशेने येत होता. पण त्याआधीच या गायी कतलीसाठी घेऊन जात असल्याची खबर आजूबाजूच्या गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं.

सिवनी माळवा तहसीलमधील बारखड इथं गायींना घेऊन जात असलेला ट्रक गावकऱ्यांनी रोखला. ट्रकमध्ये दोन डझनपेक्षा जास्त गायी होत्या. गायी कतलीसाठी घेऊन जात असल्याचा समज करत संतापलेल्या गावकऱ्यांनी ट्रकमधील तिघांना बेदम मारहाण सुरु केली. यात नझीर अहमद याचा जागीच मृत्यु झाला तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

पोलिसांनी केला गुन्हा दाखल 
पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत हत्या आणि गायींच्या तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस यासंदर्भातील अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, ट्रक चालक लालाने पोलिसांना दिलेल्या माहितीत या गायी अमरावतीच्या बाजारात घेऊन जात असल्याचं सांगितलं.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x