पाटगाव शेत नांगरणी स्पर्धा आयोजकांच्या अंगलट, झी २४ तासचा दणका

पाटगाव शेत नांगरणी स्पर्धा आयोजकांच्या अंगलट 

Updated: Aug 14, 2019, 09:39 PM IST
पाटगाव शेत नांगरणी स्पर्धा आयोजकांच्या अंगलट, झी २४ तासचा दणका  title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : पाटगाव शेत नांगरणी स्पर्धा आयोजकांच्या अंगलट आली आहे. या स्पर्धेच्या ७ आयोजकांसह बैल मालक आणि चालकांविरोधात देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलस करण्यात आला आहे. झी २४ तासने ही बातमी सर्वप्रथम दाखवली होती. पाटगाव येथील नांगरणी स्पर्धेदरम्यान बैल उधळले होते. त्यानंतर आयोजनावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळे यापुढील स्पर्धांवर संक्रांत येण्याची चिन्ह दिसत आहेत.

जीवघेणी स्पर्धा 

मुक्या प्राण्याना क्रूरपणे वागवल्या बद्दल देवरुख पोलिसांनी भाजपच्या ७ जणांसह स्पर्धेत सहभागी बैल मालक व चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. झी 24 तासने प्रथम हे वृत्त प्रसिध्द केलं होतं. या स्पर्धेत अचानकपणे बैलाची शेपटी पिरगळल्याने बैल बिथरले आणि सैरभैर पळू लागले होते. याचा व्हिडिओ 'झी 24 तास'ने प्रसिध्द करताच पोलिसांनी गांभीर्याने घेत पोलिसांनी भाजपच्या ७ जणांसह स्पर्धेत सहभागी बैल मालक व चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोकणात विशेषता संगमेश्वर तालुक्यात शेत नांगरणी स्पर्धांचे पेव फुटले आहे.११ ऑगस्ट रोजी भाजपने अशीच एक स्पर्धा स्थानिक मंडळाच्या पुढाकाराने पाटगाव येथील मिलिंद दांडेकर यांच्या शेतात भरवली होती. या स्पर्धेत पाटगाव, पठारवाडी, देवरुख कुंभारवाडी, कनकाडी, निवे बुद्रूक, आरवली, मेघी येथून ५० पेक्षा अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेदरम्यान एक बैल जोडी उधळली आणि ती बॅरिकेटस तोडून बाहेर पडली. या प्रकारामुळे स्पर्धास्थळी एकच कल्लोळ झाला. 

या बैलजोडीने दोघांना चिरडले मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही...मात्र देवरुख पोलिसांनी सुनील धाक्टु गोपाळ, बाळा पंदेरे, विजय नटे, दिलीप नटे, बाबु गोपाळ, प्रमोद अधटराव, राजा गवंडी या भाजपच्या ७ जणांसह स्पर्धेत सहभागी झालेल्या बैल जोडिचे मालक आणि चालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे...

चौकशी करून पोलिस नाईक किशोर जोशी यांनी याबाबतची फिर्याद देवरुख पोलिस ठाण्यात दाखल केली. यानुसार पोलिसांनी भा द वि कलम १८८, प्राण्यांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११ (१)(क), (२) तसेच अप्पर जिल्हा दंडाधिकारी रत्नागिरी यांनी म. पो. का. कलम ३७(१)(३) प्रमाणे पारित केलेल्या आदेशाचा भंग केल्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.