विना मास्क फिरत असाल तर तुमच्यावर कारवाई!

सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांविरुद्ध ठाणे महापालिकेने कारवाई सुरु केली आहे.

Updated: Sep 12, 2020, 11:12 PM IST
विना मास्क फिरत असाल तर तुमच्यावर कारवाई! title=
संग्रहित फोटो

ठाणे : ठाण्यात सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरत असाल तर तुमच्यावर कारवाई होईल. पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ५०० रुपये दंडाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. या कारवाईसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता निरीक्षक, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक यांना नियुक्त करण्यात आलं आहे.

सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध ठाणे महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. शनिवारी एकूण ११६ व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई केली गेली. त्यातून ५८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई सुरु केली आहे. 

ठाणे महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयं तसंच खासगी कार्यालयं या ठिकाणी अनेक व्यक्ती विना मास्क फिरताना निदर्शनास आले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शुक्रवारी त्याबाबतचा आदेश काढला होता. आदेशाच्या पहिल्याच दिवशी महापालिका हद्दीमध्ये विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या एकूण ११६ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत कारवाईतंर्गत एकूण ५८ हजार दंड वसूल करण्यात आला आहे.

दरम्यान, ठाणे मनपात आतापर्यंत 31051 कोरोनाबाधित आढळले असून 1023 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात 1,54,994 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 122091 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 4134 जण कोरोनामुळे दगावले आहेत. सध्या जिल्ह्यात 28,768 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.