मुंबई : चित्रपटांमधून व्हिलनची भूमिका करणारे सयाजी शिंदे यांचा एक वेगळाच अवतार आज मुंबईमध्ये पाहायला मिळाला. सयाजी शिंदे हे घाटकोपर मानखुर्द लिंक रोड वरील नव्या उड्डाणपुलावरून प्रवास करत होते. त्यावेळी काही मुलंही बेचकी च्या सहाय्याने बगळ्यांची शिकार करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यावेळी त्यांनी गाडी बाजूला घेऊन बगळ्यांची शिकार करणाऱ्या या मुलांना हटकलं.
या मुलांचं त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये चित्रीकरण देखील केलं. सुरूवातीला या मुलांनी त्यांना विरोध देखील केला आणि हा व्हिडीओ लाईक मिळवण्यासाठी तुम्ही काढताय का असा उलट सवाल देखील त्यांनी सयाजी शिंदे यांना केला. परंतु सयाजी शिंदे यांच्या सोबत त्या परिसरातील आणखी काही व्यक्ती आल्या आणि या मुलांनी तेथून धूम ठोकली.
मानखुर्द सांताक्रुज लिंक रोड वरील या नव्या उड्डाणपुलावर या मुलांचा हा बगळ्यांची शिकार करण्याचा नित्याचाच कार्यक्रम आहे. खाडी किनारी येणारे बगळ्यांचे थवे या उड्डाणपुलाच्या बाजूनेच भरारी घेत असतात. अशावेळी बाजूच्या वस्तीतील काही मुले ही या उड्डाणपुलावर येऊन बेचकी च्या सहाय्याने या सगळ्यांवर निशाणा साधतात आणि त्यांची शिकार करून घरी घेऊन जातात. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन या मुलांवर कार्यवाही करावी अशी मागणी निसर्गप्रेमी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी केली आहे.