Gauri Pujan 2024 : अवतरली गौराई गं!... गणरायांच्या आगमनामागोमाग आता घरोघरी ज्येष्ठा गौरींचं आगमन झालं आहे. घराघरातील महिला वर्ग या गौराईच्या आगमनासाठी आणि तिच्या पूजेसाठी हिरीरिनं सहभाग घेताना दिसत असून, राज्याच्या राजकारणात आघाडीवर असणाऱ्या आणि कायमच चर्चेत असणाऱ्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीसुद्धा त्यांच्या घरी गौराईचं स्वागत केलं.
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला. जिथं कुटुंबातील महिलावर्गाच्या साथीनं आणि गावाकडे असणाऱ्या इतर अनेक महिलांच्या साथीनं आदिती तटकरे यांनी गौराईचं स्वागत केलं. अतिशय पारंपरिक पद्धतीनं तटकरे कुटुंबीयांनी गौराईचं स्वागत केलं.
पाणवठा आणि रानाच्या ठिकाणी जात तिथं जमिनीचा काही भाग सारवत त्यावर पानविडा मांडून त्याची पूजा करण्यात आली. ज्यानंतर गौराईची आरती करत पदर खोचून आदिती तटकरे यांनी गौर डोक्यावर घेतली. आपण आधुनिकतेच्यासाथीनं कितीही पुढे आलो असतो तरीही परंपरा आणि सण- उत्सवांचा विसर अद्यापही पडला नाहीय, हेच त्यांच्या या सुरेख कृतीतून पाहायला मिळालं.
सोनपावलांनी आली गौराई घरात,
चैतन्य येऊ दे सर्वांच्या जीवनात !आज आमच्या निवासस्थानी गौराईचे आगमन झाले. ही परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरु असली तरी गौराईसोबत येणारं चैतन्य हे नेहमीच नावीन्यपूर्ण असतं. गौराईचे अतिशय आनंदाने स्वागत करून सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना केली.… pic.twitter.com/VN0FKBvmKt
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 10, 2024
गौराईला घरी आणल्यानंतर रितसर त्यांचं औक्षण करून तटकरे कुटुंबीयांनी स्वागतासाठी रांग लावली. खुद्द सुनील तटकरे आणि इतर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद यावेळी पाहण्याजोगा ठरला. गौराईचं देखणं रुप प्रत्येकजण मनात साठवत होता. अशा या राजकीय कुटुंबातील गौराईचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरलही झाला आणि चर्चेतही आला. तुमच्या गौराईचं स्वागत करण्याची नेमकी पद्धत काय? कोकणातल्या गौराईंचा सण तुम्ही कधी अनुभवलाय? कमेंटमध्ये नक्की सांगा...